Join us  

WTC Final 2021: ...अन् भारतीय संघ ऐतिहासिक कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडकला!

आयसीसी कसोटी विश्वविजेता अंतिम सामन्याची नांदी भाग १ - आयसीसी कसोटी विजतेपदाचा मुकुट कोणाच्या शिरावर विराजमान होणार, पहिला मानकरी कोण हे, हा अंतिम सामना ठरवेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:19 AM

Open in App

- सुबोध सुरेश वैद्य, बीसीसीआय अधिकृत गुणलेखक (स्कोअरर)

येत्या १८ जूनकडे आख्ख क्रिकेटविश्व डोळे लावून बसलंय. त्याला कारण ही तसं साजेसं आहे. पहिल्यांदाच क्रिकेट जगतात कसोटी सामन्यांच्या विजेतेपदाचा अंतिम सामना होऊ घातलाय. होय, आयसीसी कसोटी विजतेपदाचा मुकुट कोणाच्या शिरावर विराजमान होणार, पहिला मानकरी कोण हे, हा अंतिम सामना ठरवेल. इंग्लंडच्या साऊथहॅम्पटनला रोझ बाउल येथे हा सामना १८ जून ते २२ जून दरम्यान पारंपरिक पध्दतीने खेळवला जाणार आहे. पारंपरिक पध्दतीने अश्यासाठी की, ह्या विजेतेपदाच्या शर्यतीतले काही सामने दिवस-रात्र (पांढऱ्या चेंडूने) खेळवले गेले. लाल चेंडूने व पांढऱ्या शुभ्र गणवेशात खेळलेल्या सामन्यांची मजा काही औरच. तर, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा हा सामना रंगणार आहे. ह्या सामन्याचे प्रतिस्पर्धी संघ न्यूझीलंड व आपला भारत.

टीम इंडियाच्या विक्रमांना नाही तोड; मुंबई इंडियन्सनं आकडे सांगून किवींच्या मनात भरवली धडकी!

ह्या अश्या इतिहासात नोंद होणाऱ्या सामन्याच्या आधी दोन्ही संघाचा प्रवास कसा झाला व ह्या स्पर्धेचे निकष काय हे आपण जाणून घेऊया. त्या आधी नमूद करावं असं, हा सामना निकाली ठरावा ह्यासाठी आयसीसी ने एक दिवस राखून ठेवलाय, म्हणजेच जर २२ जून ला सामना संपला नाही आणि वेळ कमी पडला तर २३ जून ला सामना सुरु राहील व तरीही जर तो निर्णयाकडे पोहोचला नाही तरच दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपदाचा मान मिळेल. 

२९ जुलै २०१९ रोजी ह्या स्पर्धेची अधिकृत घोषणा आयसीसी ने केली. २०१९-२०२१ आयसीसी कसोटी विजेतेपदाच्या स्पर्धेला १ ऑगस्ट २०१९ ला इंग्लंड-ऑस्ट्रलिया या दोन संघांमध्ये एड्जबस्टेन बर्मिंगहॅम येथे सुरुवात झाली. हा सामना ऑस्ट्रेलीया ने २५१ धावांनी घसघशीत जिंकला, व आपला विजेतेपदाचा इरादा नव्हे, दावा स्पष्ट केला. मुळातच दशकापूर्वी आयसीसीच्या विचाराधीन असलेला हा विजेतेपदाचा उरूस शेवटी सुरु झाला. २०१०, २०१३ व २०१७ ला रद्द झालेली हि संकल्पना प्रत्यक्षात उतरली. ह्या स्पर्धेच्या पायाभरणीचा अर्थात बीजपेरणीचा हंगाम २०१९-२१ अशी नोंद दफ्तरी होईल. २०२१-२३, २०२३-२५, २०२५-२७, आणि २०२७-२९ असे येणारे हंगाम विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने आयसीसीच्या पटलावर आहेत. 

WTC Final India's 15-member squad : मोठी बातमी; टीम इंडियानं फायनलसाठी निवडले 15 शिलेदार, जाणून घ्या कोण IN, कोण OUT! 

कसोटी खेळणाऱ्या १२ देशांपैकी ९ देश ह्या स्पर्धेत सहभागी झाले. अफगाणिस्तान, झिम्बाब्वे व आयर्लंड वगळता ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश, वेस्टइंडीज व श्रीलंका आखाड्यात होते. प्रत्येक देशाला सहा स्पर्धक देशांशी कसोटी मालिका खेळणे क्रमप्राप्त होते. तीन मालिका मायदेशात तर तीन परदेशात. प्रत्येक मालिकेत किमान दोन तर कमाल पाच कसोटी सामने खेळावेच लागणार होते. सर्वच संघ समान सामने खेळणार नसले तरीही समान मालिका खेळणार होते. शेवटीं गुण-तालिकेतले पहिले दोन संघ अंतिम विजयासाठी झुंजतील अशी रचना ह्या स्पर्धेची होती. प्रत्येक संघ त्या मालितेतून जास्तीत जास्त १२० गुणांची कमाई करू शकणार होता. कोविड महामारीचा फटका ह्या स्पर्धेलाही बसलाच. काही सामने वा मालिका रद्द अथवा पुढे ढकलल्या गेल्या. शेवट नोव्हेंबर २०२० मध्ये आयसीसी ने जाहीर केलं की गुण तक्त्यातल्या सरासरीच्या आधारावर विजेता ठरेल. पण त्या नंतर काही मालिका खेळवणे शक्य झालं व मूळ कार्यक्रम पत्रिकेनुसार १८ जून ला अंतिम सामन्याचा सोहळा नजरेच्या टप्प्यात आला. 

०२ फेब्रुवारी २०२१ ला ऑस्ट्रलिया ने त्यांचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला व न्युझीलंड ला विजेतेपदाच्या अंतिम सामन्याचा मार्ग सुकर झाला. ०६ मार्च २०२१ ला भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकून आपलं अंतिम सामन्यासाठीची जागा पक्की केली. पुढील लेखात आपण ह्या स्पर्धेच्या गुण पध्दतीबद्दल जाणून घेऊया

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड