वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये आज नवा इतिहास नोंदवला गेला. या स्पर्धेच्या इतिहात आज पहिल्यांदाच सुपर ओव्हरचा थरार रंगला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि यूपी वुमेन्स वॉरियर्स यांच्यातील सामना टाय झाल्यानंतर खेळवण्यात आलेल्या सुपर ओव्हरमध्ये सोफी एकेलस्टोन हिने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर यूपी वुमेन्स वॉरियरने बाजी मारली.
या लढतीत यूपी वुमेन्स वॉरियर संघाने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. मात्र बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार स्मृती मंधाना अवघ्या ६ धावा काढून बाद झाली तिला दीप्ती शर्मा हीने डगआऊटची वाट दाखवली. त्यानंतर मात्र डॅनी वेट-होग (५७) आणि एलिस पेरी ( नाबाद ९०) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूने निर्धारित २० षटकांत ६ बाद १८० धावांपर्यंत मजल मारली आणि यूपी वुमेन्स वॉरियर समोर १८१ धावांचं आव्हान दिलं.
या आव्हानाचा यूपी वुमेन्स वॉरियर संघाने जोरदार पाठलाग केला. मात्र त्यांच्या फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेल्या. १९ व्या षटका अखेर त्यांची अवस्था ९ बाद १६३ अशी झाली होती. अखेरच्या षटकात यूपीला विजयासाठी १८ धावांची गरज असताना रेणुका सिंह यांनी जबरदस्त फलंदाजी केली. तिने षटकात दोन षटकार आणि एक चौकार ठोकत संघाला विजयासमीप नेले. शेवटच्या चेंडूवर एक धाव धाव हवी असताना सोफी एकेलस्टोन ही धावबाद झाली आणि सामना टाय झाला.
त्यानंतर रंगलेल्या सुपर ओव्हरमध्ये यूपीला एका षटकात केवळ आठ धावाच करता आल्या. मात्र ९ धावांचं माफक लक्ष्य पार करणं बंगळुरूला जमलं नाही. एकेलस्टोनच्या भेदक माऱ्यासमोर रिचा घोष आणि स्मृती मंधाना यांना अवघ्या चार धावाच करता आल्या आणि बंगळुरूला हा सामना गमवावा लागला.