Join us  

WPL ला मिळणार नवा चॅम्पियन! दिल्ली कॅपिटल्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात फायनल 

WPL Final 2024 : दिल्लीचा संघ शानदार फॉर्मात आहे आणि आठ सामन्यांत १२ गुणांसह त्यांचा संघ पाच संघांमध्ये अव्वल स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 11:05 AM

Open in App

WPL Final 2024 : फॉर्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला महिला प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत गतवर्षी विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. पण रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दिल्लीचे पहिल्या विजेतेपदाचे लक्ष्य असेल. गतवर्षी पहिल्या सत्राच्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने सात विकेटने पराभूत केले होते. यावेळी दिल्लीचा संघ शानदार फॉर्मात आहे आणि आठ सामन्यांत १२ गुणांसह त्यांचा संघ पाच संघांमध्ये अव्वल स्थानावर आहे.

मेग लॅनिंगने नेतृत्व करताना आठ डावांत ३०८ धावा केल्या आहेत. तर दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू मरियाने कॅप आणि ऑस्ट्रेलियाची डावखुरी फिरकीपटू जेस जोनासन यांनी ११-११ बळी घेतले आहेत.या सत्रात दिल्लीला मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरिअर्स अशा दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय त्यांची कामगिरी शानदार झाली आहे. आरसीबीविरुद्ध झालेले सर्व चारही सामने दिल्लीने जिंकले आहेत. पण अंतिम फेरीत मागील कामगिरीमुळे कोणताही फरक पडणार नाही. अंतिम लढतीत दबावाचा सामना करणारा संघ विजेतेपदाचा मानकरी ठरेल.

दिल्लीला लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा असेल. जेमिमा राॅड्रिग्ज फॉर्मात आहे. पण अष्टपैलू एलिसे कॅप्सी आणि कॅप यांच्याकडून शानदार कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत जोनासन, कॅप आणि शिखा पांडे यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. फिरकीपटू राधा यादव हिची कामगिरीही महत्त्वाची ठरेल.  आरसीबीने रोमांचक एलिमिनेटर सामन्यात कमी धावसंख्या उभारूनही मुंबईला पराभूत केले. अष्टपैलू एलिसे पेरी हिच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तिने सात बळीही घेतले आहेत. स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन, ऋचा घोष आणि सोफी मोलिनू यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा असेल. गोलंदाजीत रेणुका सिंह, श्रेयांका पाटील यांना चांगली कामगिरी करावी लागेल.

प्रतिस्पर्धी संघ

दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), लाॅरा हॅरिस, तानिया भाटिया, जेमिमा राॅड्रिग्ज, शेफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, मरियाने कॅप, शिखा पांडे, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासन, मिन्नू मनी, पूनम यादव, अरुंधती रेड्डी, टिटास साधू, राधा यादव, अश्विनी कुमारी, अपर्णा मंडल, स्नेहा दीप्ती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष, दिशा कासट, एस. मेघना, इंद्राणी रॉय, सतीश शुभा, हिथर नाइट, सिमरन बहादूर, एन. डी. क्लेर्क, सोफी डिव्हाइन, श्रेयांका पाटील, ॲलिसे पेरी, आशा शोभना, एकता बिश्त, केट क्रॉस, सोफी मोलिनू, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंह, जॉर्जिया वेअरहॅम.

ठिकाणअरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्लीवेळसायंकाळी ७.३० वाजता.थेट प्रक्षेपणस्पोर्ट्‌स १८ नेटवर्क

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स