Join us

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सामना सुरू असताना मैदानात उभं राहून कॉमेंट्री

नासिर हुसेनची विकेटकिपर आणि स्लिपच्या मधोमध उभं राहून कॉमेंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 12:36 IST

Open in App

क्रिकेट सामन्याचं समालोचन तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. समालोचक स्टुडिओमधून समालोचन करताना तुन्ही अनेकदा पाहिलंही असेल. पण तुम्ही कधी समालोचकाला सामना सुरू असताना मैदानात उभं राहून समालोचन करताना पाहिलंय का? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच नकारार्थी असेल. मात्र काल (31 मे) आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात हा प्रकार पाहायला मिळाला. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक नासिर हुसेननं स्लिपमध्ये उभं राहून समालोचन केलं. नासिर हुसेन मैदानात माईक घेऊन खेळाचं विश्लेषण करत होता. काल वर्ल्ड 11 विरुद्ध वेस्टइंडिजच्या संघात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. काही दिवसांपूर्वी कॅरेबियन बेटांवर आलेल्या वादळामुळे पाच क्रिकेट स्टेडियमचं नुकसान झालं. या स्टेडियम्सची दुरुस्ती करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्यानं हा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यातून मिळालेली रक्कम स्टेडियम्सच्या डागडुजीसाठी वापरली जाणार आहे. हा सामना आयसीसीनं त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह दाखवला होता. या सामन्यात नासिर हुसेननं मैदानातून समालोचन केलं. सामना सुरू असताना नासिर यष्टीरक्षक आणि स्लिपमधील खेळाडूंच्या मध्ये उभा होता. यावेळी नासिर अतिशय सक्रीय दिसत होता. गोलंदाज धावत येताच नासिरनं स्लिपमधील खेळाडूप्रमाणे पोझिशन घेतली. गोलंदाजानं चेंडू टाकल्यानंतर नासिर सरळ उभा राहिला आणि मग त्यानं समालोचनास सुरुवात केली. नासिरनं सामन्यातील सुरुवातीच्या काही षटकांमध्ये अशाप्रकारे मैदानात उभं राहून समालोचन केलं. नासिरच्या या समालोचनावर ट्विटरवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. हा सामना गांभीर्यानं खेळवला गेला नाही, अशा आशयाच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. नासिरला समालोचनासाठी मैदानात उभं राहण्याची गरज होती का?, असा प्रश्नदेखील अनेकांनी उपस्थित केला आहे. हा सामना आंतरराष्ट्रीय आहे की लिस्ट ए, हे आयसीसीनं स्पष्ट करावं, असंही अनेकांनी ट्विटरवर म्हटलंय.  

टॅग्स :क्रिकेटवेस्ट इंडिज