MS Dhoni Raksha Khadse Meeting: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या ४४ वर्षांचा आहे. 'कॅप्टन कूल' म्हणून जगभरात ओळखला जाणारा धोनी, क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाल्यानंतरही अजूनही प्रसिद्धीच्या झोतात आहे. विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आज केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची नवी दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली आणि विशेष संवाद साधला. त्या दोघांमध्ये झालेला संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
महेंद्रसिंग धोनीसोबतची बैठक ही मानसिक शक्ती, प्रशिक्षण विकास आणि स्पोर्ट्स सायन्स या विषयांवर केंद्रित होती. या संवादातील विचारांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वांगीण विकासाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. खेळाडूंच्या यशामागे केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे, तर मानसिक स्थैर्य आणि योग्य मार्गदर्शनही महत्त्वाचे असते. तसेच, प्रशिक्षक आणि सहाय्यक स्टाफची भूमिकाही निर्णायक ठरते असे चर्चेत बोलण्यात आले. या संवादात क्रीडा विज्ञानाच्या (sports science) मदतीने खेळाडूंची कामगिरी आणि शारीरिक तंदुरुस्ती कशी सुधारता येते, यावरही चर्चा झाली. सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा वर्ल्डकप विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपल्या शांत व संयमी स्वभावामुळे 'कॅप्टन कूल' हे बिरूद पटकावले आणि मिरवले. धोनीने या नावावर अधिकृतरित्या हक्क सांगितला. धोनीने 'कॅप्टन कूल' या नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल केला होता. जून २०२३ मध्ये धोनीने कोलकाता ट्रेडमार्क रजिस्ट्री ऑफिसमध्ये या संदर्भातील अर्ज दाखल केला होता. हा अर्ज स्वीकारण्यात आला. त्यामुळे संयमी स्वभावासोबतच 'कॅप्टन कूल' या नावावरही आता धोनीचाच हक्क आहे.