ख्राईस्टचर्च : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागा निश्चित करण्यासाठी भारतीय संघ मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडेल. तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या भारताने आतापर्यंत स्पर्धेत दिमाखदार कमागिरी करताना आपल्या चारही सामन्यांत बाजी मारत धडाक्यात उपांत्य फेरी गाठली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने पहिल्याच सामन्यात दुबळ्या अफगाणिस्तानकडून पराभव पत्करल्यानंतर सलग तीन सामन्यांत विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.
विशेष म्हणजे नुकताच झालेल्या आयपीएल लिलावामध्ये मोठमोठी बोली मिळवल्यानंतर भारताचे युवा स्टार कशा प्रकारे खेळी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्पर्धेत आतापर्यंत भारताने विजयी मालिका कायम राखली असून पाकिस्तानचा प्रवास मात्र संघर्षमय राहिला आहे. तरी, त्यांनी गेल्या दोन सामन्यांमध्ये रोमांचक विजय मिळवताना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघांना प्रत्येकी ३ बळींनी नमवले आहे. गोलंदाजांची कामगिरी पाकिस्तानसाठी चांगली ठरली असताना, फलंदाजांनी मात्र निराश केले आहे. डावखुºया शाहीन आफ्रिदी याने चांगले प्रदर्शन करताना पाकिस्तानला सावरले आहे. त्याचप्रमाणे मधल्या फळीतील अली जरियाब आसिफने दोन वेळा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दमदार फलंदाजी केली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध ५९, तर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७४ धावांची खेळी केली आहे.
दुसरीकडे, फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय वेगवान गोलंदाजांचे मुख्य आव्हान पाकपुढे असेल. कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी पाकिस्तानच्या फलंदाजीतील कमजोरीचा फायदा उचलण्यास उत्सुक असतील. दरम्यान, या स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर आयपीएल लिलावामध्ये युवा खेळाडूंवर करोडो रुपयांचा वर्षाव झाला असून या स्वप्नवत जल्लोषाला थोडा वेळ बाजूला ठेवून देशासाठी यशस्वी कामगिरी करण्याची जबाबदारी या खेळाडूंवर आहे. यासाठी प्रशिक्षक राहुल द्रविडनेही सूचना दिल्या असून त्याने म्हटले आहे, ‘आयपीएल लिलाव दरवर्षी होईल, पण दरवर्षी विश्वचषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळत नाही. शिवाय या सामन्यातून अंतिम फेरीचे दार उघडणार आहे.’ (वृत्तसंस्था)
टीम इंडियाला सांभाळून खेळावे लागेल
पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याच्यापासून भारतीय फलंदाजांना सांभाळून खेळावे लागेल. आफ्रिदीने चार सामन्यांतून ११ बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्याचवेळी, पाकिस्तानने ख्राईस्टचर्च येथेच उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला असल्याने त्यांना या मैदानाचा अधिक फायदा होईल.
आम्हाला आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशकडून मिळालेल्या पराभवाची जाणीव होती. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला बांगलादेशला पराभूत करायचे होते. आता आम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास उत्सुक आहोत.
- शुभम गिल, फलंदाज - भारत
प्रतिस्पर्धी संघ :
भारत : पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल, आर्यन जुयाल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, हार्विक देसाई, मनजोत कालरा, कमलेश नागरकोटी, पंकज यादव, रियान पराग, ईशान पोरेल, हिमांशू राणा, अनुकूल राय, शिवम मावी आणि शिवा सिंग.
पाकिस्तान : हसन खान (कर्णधार), रोहेल नजीर, मोहम्मद अली खान, अली जरियाब, अम्माद आलम, अर्शद इक्बाल, इमरान शाह, मोहम्मद ताहा, मोहम्मद मोहसिन खान, मोहम्मद मुसा, मोहम्मद जैन, मुनीर रियाज, साद खान, शाहीन आफ्रिदी आणि सुलेमान शफकत.