- अयाझ मेमन
टी२० मालिकेपाठोपाठ भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिकाही गमावली. मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतल्यानंतर भारतीयांनी शरणागती पत्करली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पराभवानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीवर अनेक प्रश्नचिन्हही उपस्थित झाले. यामुळे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर टाकलेली नजर...
विराट कोहली १० पैकी ७.५ गुण
मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या कोहलीने दोन शतकांसह स्ट्राइक रेट १००च्या वर ठेवण्यात यश मिळवले. पण ३५८ धावांचा बचाव करण्यात आणि २७३ धावांचा पाठलाग करण्यात आलेल्या अपयशामुळे धोनीच्या अनुपस्थित त्याच्या नेतृत्त्वकौशल्यावर प्रश्न निर्माण झाले.
रोहित शर्मा १० पैकी ६.५
जगातील सर्वोत्तम सलामीवीरपैकी एक असलेल्या रोहितसाठी ही मालिका संमिश्र ठरली. मालिकेच्या सुरुवातीला कधी धावा काढल्यानंतर रोहितने अखेरच्या दोन सामन्यांपासून धावा फटकावल्या.
शिखर धवन १० पैकी ६
मालिकेत एक शतक झळकावून आपला फॉर्म दाखवून देत धवनने भारतीयांना दिलासा दिला. जेव्हा धवन फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याच्यासारखा दुसरा सर्वोत्तम फलंदाज कोणीच नसतो. पण सध्या त्याच्या खेळीत सातत्याचा अभाव दिसतो.
अंबाती रायुडू १० पैकी १
अत्यंत अपयशी ठरलेल्या रायुडूने या मालिकेत ३ सामन्यांतून केवळ ३३ धावा काढल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे आगामी विश्वचषक स्पर्धेसाठ त्याचे स्थान धोक्यात येऊ शकते.
लोकेश राहुल १० पैकी ४.५
विश्वचषक स्पर्धेसाठी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून राहुलकडे पाहिले जात असताना त्याला केवळ एकाच सामन्यात खेळविण्यात आले. बऱ्यापैकी खेळ केलेल्या राहुलने अद्याप मोठी खेळी न केल्याने त्याला इंग्लंडचे तिकिट मिळणे पक्के नाही.
ॠषभ पंत १० पैकी २
महेंद्रसिंग धोनीचा पर्याय म्हणून पाहिले जात असताना पंतने यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून निराशा केली. त्याचा उत्साह दांडगा आहे, पण पसिस्थितीनुसार खेळण्यात तो मागे पडतो.
विजय शंकर १० पैकी ६.५
मालिकेत मोक्याच्यावेळी केलेल्या दमदार खेळाच्या जोरावर विश्वचषक स्पर्धेसाठी शंकरने आपले स्थान मजबूत केले आहे. त्याने अखेरच्या षटकात अप्रतिम मारा करत भारताला विजयी केले.
केदार जाधव १० पैकी ७
केदार जाधवाने स्वत:ला या मालिकेतून सिद्ध केले. त्याच्या शैलीमुळे तो प्रतिस्पर्धी खेळाडूंसाठी तो आव्हानात्मक बनतो. तो संघाला हवा असणारा फिनीशर खेळाडू आहे.
महेंद्रसिंग धोनी १० पैकी ७
अखेरच्या दोन सामन्यात धोनीची अनुपस्थिती संघाला चांगलीच जाणवली. त्याचे यष्टीरक्षण आणि त्याचा सल्ला यांची संघाला कमतरता भासली.
रवींद्र जडेजा १० पैकी ५
जडेजाने धावा कमी दिल्या. मात्र आवश्यक तेवढे बळी त्याला मिळवता नाही. त्याला फारशी चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे दुसरा अष्टपैलू म्हणून त्याच्या संघातील स्थानावर शंका आहे.
भुवनेश्वर कुमार १० पैकी ७.५
भुवीने टप्पा, वेग आणि नियंत्रण याजोरावर सर्वांना प्रभावीत केले. अखेरच्या सामन्यातील त्याची फलंदाजीही शानदार होती.
मोहम्मद शमी १० पैकी ७
आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती त्याला करता आली नाही. मात्र त्याने सातत्याने अचूक टप्प्यावर मारा केला. डेथ ओव्हर्समध्ये त्याला धावा रोखणे गरजेचे आहे.
कुलदीप यादव १० पैकी ८
कुलदीपने मालिकेत १० बळी घेतले. त्याचे चेंडूवरील नियंत्रण व फिरकी मधल्या षटकांत आॅस्ट्रेलियन फलंदाजांसाठी अडचणीची ठरली.
युझवेंद्र चहल १० पैकी ३
कुलदीप व चहलची जोडी फोडणे हे संघासाठी फारसे फायद्याचे राहिले नाही. एकाच सामन्यात चहल खेळला आणि त्यात त्याचे चेंडूवर नियंत्रण नव्हते.
जसप्रीत बुमराह १० पैकी ८.५
सुरुवातीला आणि अखेरच्या षटकांत बुमराह हा जगातील सर्वात यशस्वी गोलंदाज का आहे, हे पुन्हा दिसले. वेगातील मिश्रण व उसळीमुळे तो फलंदाजांना बुचकाळ््यात टाकतो.
(लेखक संपादकीय सल्लागार आहेत)