ICC ODI World Cup England vs New Zealand Live : डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) आणि राचिन रवींद्र ( Rachin Ravindra ) यांनी न्यूझीलंडलावन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. भारतीय वंशाच्या राचिनने मिळालेल्या संधीचं सोनं करताना वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून सर्वात जलद शतकाचा विक्रम नावावर नोंदवला. कॉनवे यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिला शतकवीर ठरला. या दोघांनी नाबाद २७३ धावांची विक्रमी भागीदारी करून न्यूझीलंडचा विजय पक्का केला.
भारतीय वंशाच्या राचिन रवींद्रने इतिहास रचला, डेव्हॉन कॉनवे पहिला शतकवीर ठरला
कॉवनेने पहिल्याच षटकात दोन चौकार खेचून चांगली सुरूवात करून दिली, परंतु विल यंगने दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट टाकली. सॅम कुरनने ही विकेट घेतली. रवींद्रने दुसऱ्या विकेटसाठी कॉनवेसह २००+ धावांची भागीदारी करून विक्रमाला गवसणी घातली. १९९६मध्ये न्यूझीलंडचा सलामीवीर नॅथन अॅस्टेलने वर्ल्ड कप पदार्पणात शतक झळकावलेले ( वि. इंग्लंड, अहमदाबाद) आणि आज २०२३ मध्ये कॉनवे यानेही त्याच्या पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात इंग्लंडविरुद्धच शतक झळकावले. न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम कॉनवेने नावावर केला. राचिनने हा विक्रम मोडला आणि ८२ चेंडूंत शतक झळकावले. राचिनने ९६ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १२३ धावा केल्या, तर कॉवनेने १२१ चेंडूंत १९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद १५२ धावा केल्या. न्यूझीलंडने ३६.२ षटकांत १ बाद २८३ धावा करून विजय पक्का केला.

तत्पूर्वी, इंग्लंडला ९ बाद २८२ धावा करता आल्या. जॉनी बेअरस्टो ( ३३) आणि डेव्हिड मलान ( १४) यांनी विकेट फेकल्या. हॅरी ब्रूकला ( २५) घाई महागात पडली. मोईन अली ( ११)ने निराश केले. रूट आणि कर्णधार जोस बटलर यांनी ७० धावांची भागीदारी केली, परंतु मॅट हेन्रीने बटलरला ४३ ( ४२ चेंडू) धावांवर माघारी पाठवले. लिएम लिव्हिंगस्टोन ( २०) चुकीचा फटका मारून झेलबाद झाला. रूटचा संघर्षाला फिलिप्सने ब्रेक लावला. रूट ८६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ७७ धावांवर त्रिफळाचीत झाला. मॅट हेन्रीने ३ विकेट्स घेतल्या. क्रिकेट इतिहासात प्रथमच सर्वच्या सर्व ११ फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले.