नवी दिल्ली : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या एका टीव्ही शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी बीसीसीआयने दोघांवर कारवाई केली. दोघांची प्रचंड बदनामीही झाली. प्रकरण तापले असताना दोघांनी माफी मागितली. अखेर हार्दिकने त्या प्रकरणावर गुरुवारी मौन सोडले.
‘आम्ही क्रिकेटपटू आहोत. असा प्रकार घडला की त्याचे पडसाद उमटणार, याची कल्पना नसते. मी तेव्हा जे बोलून गेलो, त्यानंतर
माझ्या हातात काहीच उरले नव्हते. शब्द सुटले होते. मला ते मागे
घेता आले नसते.
मी पूर्णपणे हतबल झालो होतो. टेनिस खेळाच्या भाषेत सांगायचे झाल्यास चेंडू माझ्या कोर्टमध्ये नव्हता, तो इतर कुणाच्या तरी कोर्टमध्ये होता. निर्णय घेण्याचा अधिकार नसेल, तर अधिक कात्रीत पकडले जातो,’ अशा शब्दात हार्दिकने त्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. एका नियतकालीनच्या ‘इन्स्पिरेशन’ या कार्यक्रमात पांड्या म्हणाला,‘आम्ही दोघांनी महिलांची जाहीर माफी मागितली आहे.’
राहुल सध्या लंकेविरुद्ध टी२० मालिका खेळत असून, पांड्या पाठीच्या दुखण्यावर उपचार घेत आहे. तो मागच्या वर्षी सप्टेंबरपासून क्रिकेटपासून दूर आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची भारत अ संघात निवड करण्यात आली आहे. या प्रकरणात बीसीसीआयने पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकली नव्हती. (वृत्तसंस्था)
>दहा लाखांचा दंड
आॅस्ट्रेलियाविरुद्धची टी२० मालिका आणि न्यूझीलंड दौरा होण्याआधी हार्दिक पांड्या आणि राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली. बीसीसीआयमध्ये लोकपालाची नियुक्ती नसल्याने त्यांच्यावरील बंदी तात्पुरती मागे घेण्यात आली होती. पण लोकपालांची नेमणूक करण्यात आल्यानंतर हार्दिक आणि लोकेश यांना साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर दोघांना १० लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले होते.