कराची : ‘आयपीएल आयोजित करण्यासाठी आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यावर पीसीबी विरोध करेल,’ अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) सीईओ वसीम खान यांनी दिली. त्याचवेळी खान यांनी म्हटले की, ‘आशा आहे की कोरोना विषाणू महामारीवर नियंत्रण मिळविल्यानंतर आशिया चषक टी-२० स्पर्धा यूएईमध्ये सप्टेंबर महिन्यात होईल.’ एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना खान म्हणाले की, ‘आमचा विचार पक्का आहे. आशिया चषक स्पर्धा सप्टेंबर महिन्यात होणार आहे आणि केवळ आरोग्यविषयक कारणामुळेच या स्पर्धेच्या वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो.
आयपीएलसाठी या स्पर्धेत बदल करण्यात आले, तर ते आम्हाला मान्य नसेल.’ त्यांनी पुढे म्हटले की, ‘आशिया चषक स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खेळविण्याविषयी विचार सुरू असल्याचे माझ्या कानावर आले आहे. मात्र आमच्यासाठी हे शक्य नाही. जर आशिया चषक वेळापत्रकात बदल करण्यात येत असेल, तर एका सदस्य देशासाठी वेगळा मार्ग तयार करण्याचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही याचे समर्थन करत नाही.’ (वृत्तसंस्था)