गुवाहाटी : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संयमी अर्धशतक झळकावलेल्या हीथर नाइट हिने इंग्लंडला आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत दुसरा विजय मिळवून देताना बांगलादेशच्या हातातील सामना अक्षरश: खेचून आणला. बांगलादेशला ४९.४ षटकांत १७८ धावांत गुंडाळल्यानंतर इंग्लंडने ४६.१ षटकांत ६ बाद १८२ धावा करत ४ बळींनी विजय मिळवला.
या शानदार विजयासह इंग्लंडने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत यजमान भारताला दुसऱ्या स्थानी खेचले. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची ३०व्या षटकात ६ बाद १०३ धावा अशी अवस्था झाली होती. बांगलादेशने ठरवीक अंतराने बळी घेत इंग्लंडला प्रचंड दडपणात आणले. मात्र, एका बाजूने टिकून राहिलेल्या नाइटने आपल्या अनुभवाच्या जोरावर शांतपणे खेळताना १११ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह नाबाद ७९ धावा करत इंग्लंडला विजयी केले. तिने नॅट स्किव्हर-ब्रंटसोबत तिसऱ्या बळीसाठी ७३ चेंडूंत ४० धावांची भागीदारी केल्यानंतर चार्ली डीनसोबत सातव्या बळीसाठी १०० चेंडूंत नाबाद ७९ धावांची भागीदारी केली. फहिमा खातूनने १६ धावांत ३ बळी घेत सामन्यात रंगत आणली होती. त्याआधी, सोफी एक्लेस्टोनने ३, तर लिनसे स्मिथ, चार्ली डीन आणि एलिसे कॅप्सी यांनी प्रत्येकी २ बळी घेत बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करताना बांगलादेशच्या फलंदाजांना फारसे स्थिरावू दिले नाही.
बांगलादेशकडून शोभना मोस्तरी हिने १०८ चेंडूंत ८ चौकारांसह ६० धावा केल्या. मात्र, तिची ही खेळी एकाकी झुंज ठरली. तिला इतर फलंदाजांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. तळाच्या फळीतील राबेया खान हिने २७ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ४३ धावा कुटल्याने बांगलादेशला दीडशे धावांचा पल्ला पार करता आला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : ४९.४ षटकांत सर्वबाद १७८ धावा (शोभना मोस्तरी ६०, राबेया खान नाबाद ४३, शर्मिन अख्तर ३०; सोफी एक्लेस्टोन ३/२४, चार्ली डीन २/२८, एलिसे कॅप्सी २/३१, लिनसे स्मिथ २/३३.) पराभूत वि. इंग्लंड : ४६.१ षटकांत ६ बाद १८२ धावा (हीथर नाइट नाबाद ७९, नॅट स्किव्हर-ब्रंट ३२, चार्ली डीन नाबाद २७; फहिमा खातून ३/१६, मारुफा अक्तेर २/२८.)