Join us

महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

भारताच्या प्रमुख फलंदाजांना अद्याप आपल्या लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही. भारताने मागील दोन्ही सामने जिंकले असले, तरी स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघालेल्या नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 05:28 IST

Open in App

विशाखापट्टणम : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत सलग दोन सामने जिंकल्यानंतर विजयी हॅट्ट्रिक नोंदवण्याच्या निर्धाराने यजमान भारतीय संघ गुरूवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भिडेल. दक्षिण आफ्रिका संघ सलामीला इंग्लंडविरुद्ध ६९ धावांत गारद झाल्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरूद्ध दमदार विजय मिळवून शानदार पुनरागमन केले. त्यामुळे भारताला या कडव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रमुख फलंदाजांकडून आशा असतील.

भारताच्या प्रमुख फलंदाजांना अद्याप आपल्या लौकिकानुसार खेळ करता आलेला नाही. भारताने मागील दोन्ही सामने जिंकले असले, तरी स्मृती मानधना, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या बॅटमधून अपेक्षित धावा निघालेल्या नाहीत आणि ही चिंतेची बाब आहे. श्रीलंकेविरुद्ध तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यानंतर हरलीन देओल, अमनजोत कौर, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांनी संघाला संकटातून बाहेर काढले होते. 

श्रीलंकेविरुद्ध भारताने ६ फलंदाज गमावले होते, तेव्हा केवळ १२४ धावा झाल्या होत्या आणि पाकिस्तानविरुद्ध ५ फलंदाज गमावले होते, तेव्हा केवळ १५९ धावा झाल्या होत्या. जर तळाच्या फळीतील फलंदाजांनी हातभार लावला नसता तर भारताची स्थिती बिकट होऊ शकली असती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला अशा चुका परवडणार नाहीत. यासाठीच प्रमुख फलंदाजांना मोठी भूमिका बजावावी लागेल. स्मृती, हरमनप्रीत आणि जेमिमाची बॅट बलाढ्य संघांविरुद्ध शांत राहिल्यास त्याचा निर्णायक फटका भारताला बसू शकतो.

त्याचवेळी गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एसीए-व्हीडीसीएची खेळपट्टी गुवाहाटी किंवा कोलंबोप्रमाणे नसल्याचे लक्षात ठेवून त्यांना मारा करावा लागेल. गोलंदाजांसह फलंदाजही चमकले, तर भारताला रोखणे दक्षिण आफ्रिकेला कठीण होईल.  

अमनजोत कौर परतणार? अनुभवी दीप्ती शर्माने आतापर्यंत ६ बळी घेतले असून, तिला स्नेह राणा आणि श्री चरणी यांच्याकडून चांगले सहकार्य मिळाले आहे. वेगवान गोलंदाज क्रांती गौड हिचीही प्रभावी कामगिरी झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध आजारपणामुळे खेळू न शकलेली वेगवान गोलंदाज अमनजोत कौर हिच्या तंदुरूस्तीवरही लक्ष असेल. ती परतल्यास भारताची फलंदाजीही अधिक खोलवर होईल. अशावेळी रेणुका ठाकूरला मात्र बेंचवर बसावे लागेल.

दमदार पुनरागमनाने वेधले लक्षदक्षिण आफ्रिकेने मागील सामन्यात न्यूझीलंडला ६ बळींनी नमवत शानदार पुनरागमन केले. त्याआधी इंग्लंडविरुद्ध त्यांचा संघ केवळ ६९ धावांवर गारद झाला होता. शतक ठोकणारी ताझमीन ब्रिट्झ, भरवशाची सुन लूस, कर्णधार लॉरा वाॅल्वार्डट, मारिझान काप आणि ॲलेके बॉश यांच्याकडून संघाला कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाजीत नोनकुलुलेको मलाबा, अयाबोंगा खाका, काप, मस्बाता क्लास आणि क्लो ट्रायॉन यांच्यावर दक्षिण आफ्रिकेची भिस्त असेल. 

सामन्याची वेळ : दुपारी ३ वाजल्यापासूनसामन्याचे स्थळ : एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम्थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्कलाईव्ह स्ट्रीमिंग : जिओ हाॅटस्टार

English
हिंदी सारांश
Web Title : India faces South Africa in crucial Women's World Cup match.

Web Summary : After two wins, India faces South Africa, needing their top order to fire. Smriti Mandhana and Harmanpreet Kaur must perform. Bowlers need to adapt to the pitch. South Africa seeks to build on their win against New Zealand.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५