मेलबर्न : शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने महिला टी२० विश्वचषक स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना सलग तिसरा विजय नोंदवला. चुरशीच्या झालेल्या आपल्या तिसऱ्या साखळी सामन्यात भारताने तुल्यबळ न्यूझीलंडला ३ धावांनी नमवले आणि या रोमहर्षक विजयासह भारताने यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील जागा निश्चित करणाºया पहिल्या संघाचा मानही मिळवला. मात्र त्याचवेळी, प्रमुख फलंदाजांचे कायम राहिलेले अपयश भारतासाठी चिंतेची बाब ठरली आहे.
युवा सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माची वादळी खेळी आणि त्यानंतर गोलंदाजांच्या नियंत्रित माºयाच्या जोरावर भारताने मोक्याच्यावेळी बाजी मारली. १६ वर्षीय युवा धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्माच्या तुफानी खेळीनंतरही भारताला २० षटकांत ७ बाद १३३ धावांचीच मजल मारता आली. मात्र या आव्हानाचाही यशस्वीपणे बचाव करताना गोलंदाजांनी आपले वर्चस्व राखले. दीप्ती शर्मा, शिखा पांड्ये, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि राधा यादव या सर्वांनी धावांना वेसण घालताना प्रत्येकी एक बळी घेत किवींना २० षटकांट ६ बाद १३० धावांवर रोखले. भारताने पहिले षटक फिरकीपटू दीप्तीला दिल्यानंतर न्यूझीलंडने आक्रमक सुरुवात करताना १२ धावा वसूल केल्या. मात्र शिखाने रचेल प्रीस्टला बाद करुन न्यूझीलंडला पहिला धक्का दिला आणि यानंतर ठराविक अंतराने भारताने बळी घेत किवींना दडपणाखाली ठेवले.
कर्णधार सोफी डिव्हाईन हिला जखडून ठेवण्यात भारताला यश आले. सोफीला २१ चेंडूंत केवळ १४ धावाच करता आल्या. याचा फटकाही न्यूझीलंडला बसला. तसेच प्रमुख फलंदाज सूझी बेट्सही १३ चेंडूंत केवळ ६ धावा काढून परतली. मॅडी ग्रीन (२४), केटी मार्टिन (२५) यांनी थोडीफार झुंज दिली खरी, मात्र आवश्यक धावगती राखण्यात त्यांना यश आले नाही. यानंतर धावगती १३ धावांच्याही पुढे गेल्यानंतर आक्रमकतेच्या नादात न्यूझीलंडचे फलंदाज बाद झाले. अॅमेलिया केर हिने अखेरच्या काही षटकांमध्ये चौफेर फटकेबाजी करताना १९ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ३४ धावा कुटत न्यूझीलंडला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. (वृत्तसंस्था)
१९वे षटक पडले महागात
अखेरच्या दोन षटकांमध्ये न्यूझीलंडला ३४ धावांची गरज असताना अॅमेलिया केरने सामन्याचे चित्रच पालटले. यावेळी तिने भारताची हुकमी लेगस्पिनर पूनम यादववर हल्ला चढवताना चार चौकार खेचले. या षटकात एकूण १८ धावांची खैरात झाल्याने न्यूझीलंडसाठी अखेरच्या ६ चेंडूंत १६ धावा असे समीकरण झाले.
अखेरच्या षटकांत हायले जेन्सनने आणि केरने शिखा पांड्येला प्रत्येकी एक चौकार मारत एका चेंडूत ५ धावांची गरज अशी थरारक परिस्थिती निर्माण केली. मात्र शिखाने कल्पकतेने मारा करत अखेरचा चेंडू केरला ऑफ साईडला पायात टाकला आणि या चेंडूवर जेन्सन धावबादही झाल्याने भारताने ३ धावांनी बाजी मारली.
शेफालीचा विश्वविक्रम गोलंदाजांना मजबूत चोप
देणाºया शेफाली वर्माने टी२० विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा फटकावण्याचा विश्वविक्रम केला.
तिने आतापर्यंत तीन सामन्यांत १७२.७२च्या तुफानी स्ट्राईक रेटने ११४ धावा केल्या आहेत. तिने सलामीला आॅस्टेÑलियाविरुद्ध १९३.३३च्या स्ट्राईक रेटने, तर यानंतर बांगलादेशविरुद्ध २२९.४१ आणि न्यूझीलंडविरुद्ध १३५.२९च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.
प्रमुख फलंदाजांचे अपयश
युवा फलंदाज शेफाली वर्माने पुन्हा एकदा आपल्या तडाखेबंद फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधले. मात्र त्याचवेळी इतर फलंदाजांचे अपयश आणि त्यांच्या खेळातील कमतरताही सर्वांना दिसून आल्या. शेफालीने केलेल्या झंझवाती फटकेबाजीच्या जोरावर भारताने पॉवरप्लेच्या षटकांत ४९ धावा चोपल्या. मात्र, भारताने ४३ धावांच्या अंतराने ६ बळीही गमावले. त्यामुळे शेफालीने करुन दिलेल्या धडाकेबाज सुरुवातीचा फायदा घेण्यात भारतीयांना यश आले नाही.
स्मृती मानधनासह (११) जेमिमा रॉड्रिग्ज (१०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (१) यादेखील अपयशी ठरल्या. तळाच्या फळीत दीप्ती शर्मा (८), वेदा कृष्णमूर्ती (६) यांनाही अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. जर शेफालीही झटपट बाद झाली असती, तर स्पर्धेत भारताचा पहिला पराभव निश्चित झाला असता.
आठव्या आणि दहाव्या षटकांत शेफालीला जीवदानही मिळाले होते. मात्र आता उपांत्य फेरी जरी निश्चित झालेली असली, तरी भारताला अद्याप आपला अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे भारतासाठी औपचारिक असलेल्या या सामन्यात प्रमुख फलंदाजांकडे आपला फॉर्म मिळवण्याची संधी असेल.
आम्हाला बालिश चुका टाळाव्या लागतील - हरमनप्रीत
सलग तिसºया सामन्यात चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात फलंदाज अपयशी ठरल्याने भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने आपली नाराजी स्पष्ट केली. त्यामुळेच टी२० विश्वचषकातील पुढील महत्त्वाच्या सामन्यांआधी बालिश चुका टाळण्यासाठी तिने फलंदाजांना सावध केले. हरमनप्रीत म्हणाली, ‘आम्हाला चांगली सुरुवात मिळते; परंतु आम्ही ही लय कायम ठेवू शकलो नाही. पुढील सामने चुरशीचे असल्याने आता आम्हाला बालिश चुका टाळाव्या लागतील. शेफाली वर्मा आम्हाला चांगली सुरुवात करून देत आहे. तिने सुरुवातीला केलेल्या धावा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत.’
‘संघाच्या विजयात योगदान देऊ शकल्याने चांगले वाटत असून मी माझ्या खेळीने आनंदित आहे. कामगिरीत सातत्य राखू करू इच्छिते. मी खराब चेंडूंसाठी प्रतीक्षा केली आणि संधी मिळताच मोठे फटके खेळले.’
- शेफाली वर्मा
गेल्या १२ ते १४ महिन्यांपासून आम्ही एक संघ म्हणून खूप सुधारणा केली. आम्ही सकारात्मक स्थितीत असून तिरंगी मालिकेपासून चांगले खेळत आहोत. एक संघ म्हणून आम्ही आता परिस्थितीनुसार खेळ करीत आहोत. निकाल आमच्या बाजूने आहेत; परंतु आम्हाला लय कायम ठेवावी लागेल. याजोरावरच आम्ही अंतिम सामनाही जिंकू शकतो. शेफाली चांगली खेळत आहे आणि अन्य फलंदाजांनीही जबाबदारी घ्यायला हवी.
- तानिया भाटिया
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ८ बाद १३३ धावा. (शेफाली वर्मा ४६, तानिया भाटिया २३, राधा यादव १४, स्मृती मानधना ११; रोजमेरी मायर २/२७, एमिलिया केर २/२१, ली ताहुहू १/१४, सोफी डिवाईन १/१२, ली कास्पेरेक १/१९) वि.वि. न्यूझीलंड : २० षटकांत ६ बाद १३० धावा. (मॅडी ग्रीन २४, एमिलिया केर नाबाद ३४. कॅरी मार्टिन २५, दीप्ती शर्मा १/२७, शिखा पांडे १/२१, राजेश्वरी गायकवाड १/२२, पूनम यादव १/३२, राधा यादव १/२५).
शेफालीच्या चांगल्या सुरुवातीनंतरही आम्ही भारताला कमी धावसंख्येत रोखत चांगली कामगिरी केली. ज्याप्रकारे संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला ते शानदार होते. एमिलिया केर हिने खूप चांगली भूमिका बजावली.
- सोफी डेवाइन, कर्णधार - न्यूझीलंड