विशाखापट्टणम : भारतीय संघाने मंगळवारी दुसरा महिला टी-२० सामना जिंकताना श्रीलंकेचा ७ बळींनी पराभव केला. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या शेफाली वर्माने आक्रमक नाबाद अर्धशतक झळकावले. श्रीलंकेला २० षटकांत ९ बाद १२८ धावांवर रोखल्यानंतर भारताने ११.५ षटकांमध्येच ३ बाद १२९ धावा केल्या. यासह भारताने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना शेफालीने ३४ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६९ धावांचा चोप दिला. तिने स्मृती मानधनासह १९ चेंडूंत २९ धावांची सलामी दिली. स्मृती (१४) लवकर बाद झाल्यानंतर शेफाली आणि जेमिमा राॅड्रिग्ज यांनी २८ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी करत भारताचा विजय स्पष्ट केला. जेमिमा १५ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह २६ धावा फटकावून बाद झाल्यानंतर शेफाली आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (१०) यांनी विजय निश्चित केला.
त्याआधी भारतीयांच्या नियंत्रित माऱ्यापुढे श्रीलंकेचे फलंदाज ढेपाळले. कर्णधार चामरी अट्टापट्टू (३१), हसिनी परेरा (२२) आणि हर्षिता समरविक्रमा (३३) या प्रमुख फलंदाजांनी धावा काढल्या. वैष्णवी शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
धावफलक | श्रीलंका : विश्मी गुणरत्ने झे. व गो. गौड १, चामरी अट्टापट्टू झे. अमनजोत गो. राणा ३१, हसिनी परेरा झे. व गो. चरणी २२, हर्षिता समरविक्रमा धावबाद (अमनजोत-रिचा) ३३, काविशा दिलहारी झे. अमनजोत गो. चरणी १४, निलाक्षिका सिल्वा झे. चरणी गो. वैष्णवी २, कौशिनी नुथ्यांगना धावबाद (गौड-रिचा) ११, शाशिनी गिम्हानी झे. स्मृती गो. वैष्णवी ०, काव्या काविंदी धावबाद (चरणी-रिचा) १, मालकी मादरा नाबाद १. अवांतर - १२. एकूण : २० षटकांत ९ बाद १२८ धावा. बाद क्रम : १-२, २-३८, ३-८२, ४-१०४, ५-१०९, ६-१२१, ७-१२२, ८-१२६, ९-१२८. गोलंदाजी : क्रांती गौड ३-०-२१-१; अरूंधती रेड्डी ३-०-२२-०; स्नेह राणा ४-१-११-१; अमनजोत कौर २-०-११-०; वैष्णवी शर्मा ४-०-३२-२; श्री चरणी ४-०-२३-२. भारत : स्मृती मानधना झे. काविंदी गो. दिलहारी १४, शेफाली वर्मा नाबाद ६९, जेमिमा राॅड्रिग्ज झे. दिलहारी गो. काविंदी २६, हरमनप्रीत कौर त्रि. गो. मदारा १०, रिचा घोष नाबाद १. अवांतर - ९. एकूण : ११.५ षटकांत ३ बाद १२९ धावा. बाद क्रम : १-२९, २-८७, ३-१२८. गोलंदाजी : माल्की मदारा २.५-०-२२-१; काव्या काविंदी ३-०-३२-१; काविशा दिलहारी २-०-१५-१; आयनोका रणवीरा २-०-३१-०; चामरी अट्टापट्टू १-०-१७-०; शाशिनी गिम्हानी १-०-१२-०.