आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात भारत आणि श्रीलंका आमने- सामने आले. आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर आज खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला तीन विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेची फंलदाज नीलाक्षी दा सिल्वाच्या वादळी फलंदाजी केली. तिने अवघ्या ३३ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागिदारी रचली. परंतु, नवव्या षटकात इनोका रानावीरा गोलंदाजीवर स्मृती मानधना रनआऊट झाली. तिच्या पाठोपाठ प्रतिका एलबीडब्लू बाद झाली. हनलीन देओल आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण २० व्या षटकात हरलीन बाद झाली. हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स बाद झाल्यानंतर भारताची विकेटकिपर रिचा घोषने महत्वपूर्ण ५८ धावा केल्या. यानंतर भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. भारताने ५० षटकांत ९ विकेट गमावून श्रीलंकेसमोर २७६ धावांचे लक्ष्य ठेवले. श्रीलंकेकडून सुगंधिका कुमारी आणि चमारी अटापट्टू यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, देवमिनी विहंगा इनोका रणवीरा यांना एक-एक विकेट मिळाली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने ३० धावांवर पहिला विकेटस् गमावला. पण त्यानंतर श्रीलंकेने संयम दाखवत खेळ पुढे नेला. श्रीलंकेने २२ व्या षटकात दुसरा विकेट गमावला. हर्षिता समरविक्रमा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी अर्धशतक झळकावून श्रीलंकेच्या विजयाचा पाया रचला. हर्षिता आणि निलाक्षी बाद झाल्यानंतर अनुष्का संजीवनी (२८ चेंडूत २३ धावा) सुगंधिका कुमारी (२० चेंडूत १९ धावा) यांनी संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून स्नेह राणा हिने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, अरुंधती रेड्डी, प्रतिका रावल आणि नल्लापुरेड्डी चरणी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
भारतीय महिला संघाची प्लेईंग इलेव्हन:प्रतिका रावल, स्मृती मानधना (उप-कर्णधार), हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, काशवी गौतम, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, नल्लापुरेड्डी चरणी.
श्रीलंका महिला संघाची प्लेईंग इलेव्हन:चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, कवीशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी, देवमिनी विहंगा, मलकी मदारा, सुगंधिका कुमारी, इनोका रणवीरा.