Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

आयसीसी, सीजीएफने जाहीर केली पात्रता फेरी. यजमान इंग्लंडशिवाय आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या सहा स्थानावर असलेले संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 05:20 IST

Open in App

दुबई : क्वालालम्पूर येथे १९९८ साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटचा समावेश केल्यानंतर  आता २०२२च्या बर्मींघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या टी- २० प्रकारासाठी महिला क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यजमान इंग्लंडशिवाय आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या सहा स्थानावर असलेले संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. उर्वरित एका संघाचा  निर्णय पात्रता स्पर्धेच्या आधारे होईल. २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत बर्मींघम येथे स्पर्धेचे आयोजन होणार असून क्रिकेटचे आयोजन एजबस्टन मैदानावर होईल. चार वर्षांत एकद होणाऱ्या या स्पर्धेसाठी आयसीसी आणि सीजीएफ बुधवारी पात्रता प्रक्रिया जाहीर केली. स्पर्धेत आठ संघांचा समावेश असून यजमान इंग्लंडशिवाय यंदा एक एप्रिलपर्यंत आयसीसी क्रमवारीत पहिल्या सहा स्थानांवर असलेल्या अन्य संघांना थेट प्रवेश मिळेल. भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेच्या आठव्या संघाचा निर्णय पात्रता फेरीद्वारे होईल. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पात्रता फेरीचा विजेता घोषित होणे अनिवार्य असेल. पात्रता फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.

आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांनी राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटचा समावेश ही आमच्यासाठी आनंददायी बाब असल्याचे म्हटले आहे. महिला क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून जागतिक स्तरावर याचा प्रसार करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाला खेळाप्रति पाठिंबा दर्शविल्याबद्दल धन्यवाद देतो, ’ असे साहनी म्हणाले.

या स्पर्धेत कॅरेबियन खेळाडू आपापल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. यामुळे वेस्ट इंडिजऐवजी कोणता देश मुख्य स्पर्धेत खेळणार याचा निर्णय पात्रता फेरीद्वारे होईल. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या अध्यक्ष डेम लुईस मार्टिन म्हणाल्या, ‘२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला टी-२० क्रिकेटचा समावेश करताना आनंद होत आहे. क्रिकेट  राष्ट्रकुलचा लोकप्रिय क्रीडा प्रकार असून १९९८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष क्रिकेटचा समावेशानंतर पहिल्यांदा महिला क्रिकेटचा समावेश  झाला आहे.’

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, ‘राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटचा समावेश ही महिला खेळाडूंसाठी पर्वणी आहे. सर्व खेळाडू आणि खेळासाठी हे मोठे व्यासपीठ ठरेल. मी या स्पर्धेत नक्की खेळू शकेन, अशी आशा आहे. या स्पर्धेतील सामने शानदार होतील, यात शंका नाही. मला व्यक्तिश: आनंद झाला आहे.’

टॅग्स :महिला