Join us  

हरलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरची विनिंग गोष्ट!

हायर ॲण्ड फायरच्या पैशाच्या खेळानं अपमान करून संपवलंच होतं त्याला, पण तो हरला नाही. कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2021 3:26 PM

Open in App

- चिन्मय लेले

डेव्हिड वॉर्नर, हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक फोटो, खांद्यात तोंड खूपसून डोळ्यातलं पाणी लपवणारा. ती एक इमेज आणि वर्ल्ड कप जिंकून देणारा जबरदस्त बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार स्वीकारणारा वाॅर्नर ही एक इमेज.माणूस तोच. काळ बदलतो. कामगिरी बदलते आणि लोकांचे चेहरे, नजरा बदलतात. वॉर्नरसारखं आपण निवडायचं एवढंच असतं की आपल्यासाठी काय महत्त्वाचं, टीका करणारी तोंड की आपण स्वत:वर विश्वास ठेवून पुन्हा पहिल्यापासून स्वत:वर केलेलं काम..

वर्ल्ड कप जिंकल्यावर वॉर्नर म्हणालाही, मी पुन्हा माझ्या बेसिक्सवर काम केलं, पुन्हा गिरवले धडे. पुन्हा सिंथेटिक खेळपट्टीवर कसून सराव केला. मला खेळताना आनंद वाटत होताच, मी बेसिक्स पुन्हा गिरवले..’ हे पुन्हा पुन्हा आपले बेसिक्स गिरवणं, आपला पाया पक्का करणं, आपल्यावरच काम करणं आणि लोक टीका करतात म्हणून नव्हे, तर आपली कामगिरी सुधारावी, आपलं अस्सल आपल्या हाती लागावं म्हणून हे किती भारी आहे.

नव्या कार्पोरेट काळात, चकचकीत प्रेझेन्टेशनच्या जमान्यात आणि बोलघेवड्या पोपटपंचीत आपल्या बेसिक्सवर पुन्हा काम करणं, पुन्हा पुन्हा सराव करणं, प्लेइंग फॉर द गॅलरी असं न करता, आपण आपल्या क्राफ्टवरच मेहनत करणं हेच ‘वर्ल्डक्लास’ आहे. आणि काळ बदलला म्हणून ते बदलत नाही हे वॉर्नरने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

लोकांनी त्याला मोडीत काढलं, कप्तान होता तर थेट मैदानाबाहेर काढलं, बारावा गडी म्हणून पाणी आणायला लावलं. होता होईतो सगळे अपमान केले. त्यानंही ते पचवलं. त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी होत नव्हतीच. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा हा कर्णधार. २०१६ मध्ये त्यानंच कप्तान म्हणून संघाला विजेतेपद मिळवून दिलं. मात्र, २०२१ उजाडता उजाडता चित्र बदललं.

कर्णधारपद तर गेलंच, संघातूनही डच्चू मिळाला. वॉर्नरचा अपमान योग्य नाही असं जगभरातले क्रिकेट चाहते म्हणाले, पण जिथं फक्त पैशाची हायर ॲण्ड फायर भाषा कळते, त्या जगाला वॉर्नरच्या टॅलन्टचं अप्रूप उरलेलं नव्हतं. त्याचं करिअर संपेल की काय इतपत टीका, अपमान त्यानं सहन केलं. म्हातारा, आऊट ऑफ फॉर्म म्हणून त्याची किती हेटाळणी झाली.

एखादा असता तर संपलाच असता या साऱ्यांत..

पण वॉर्नर पुन्हा उभा राहिला..

त्याचा मंत्र एकच, जो त्यानं सांगितलाच..

मी पुन्हा बेसिक्सवर काम केलं, पुन्हा कसून सराव केला, पुन्हा शॉट गिरवले..

हे सगळं केलं आणि क्रिकेटने त्याला पुन्हा स्वीकारलं..

परिणाम तो जगज्जेत्या संघाचा कणा बनला..

आपला कणा ताठ ठेवून जर स्वत:वर काम करत राहिलं पुन्हा पुन्हा..

तर जिंकता येतं.. जग सलाम करायला उभंच असतं मग..

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलिया
Open in App