नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाच्या आयपीएल सत्रात बक्षिसांची रक्कम कमी करण्याचा निर्णय
घेतला. खर्चात कपात म्हणून विजेत्या आणि उपविजेत्या संघाला देण्यात येणारी रोख रक्कम २०१९ च्या तुलनेत अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच आयपीएल फ्रेंचाईजींना पाठविलेल्या माहिती पत्रकात बीसीसीआयने आयपीएल विजेत्या संघाला मिळणारी २० कोटीची रक्कम आता केवळ १०कोटी रुपये असेल, असे म्हटले आहे.
बीसीसीआयच्या पत्रानुसार खर्चात कपात करण्याच्या धोरणानुसार सर्व रोख पुरस्कार नव्याने जाहीर करण्यात आले. त्यानुसार विजेत्या संघाला १० कोटी, उपविजेत्या संघाला १२ कोटी ५० लाखांऐवजी ६ कोटी २५ लाख रुपये दिले जातील. पात्रता फेरी गमविणाऱ्या दोन्ही संघांना ४ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. सर्वच फ्रेंचाईजी चांगल्या स्थितीत असून त्यांना स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रायोजनाचे अनेक उपाय माहिती आहेत. त्यामुळेच बक्षिसांची रोख रक्कम कमी करण्यात आली. आयपीएल सामन्याचे यजमानपद भूषविणाºया राज्य संघटनेला मात्र एक कोटी दिले जातील. त्यात बीसीसीआय आणि फ्रेंचाईजी यांचे प्रत्येकी ५० लाख रुपयांचे योगदान राहील. त्याचप्रमाणे, विमान प्रवास आठ तासांपेक्षा कमी असल्यास यापुढे बीसीसीआयच्या मधल्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना बिझनेस क्लास विमान प्रवास मिळणार नाही. (वृत्तसंस्था)