- व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...
अपेक्षेप्रमाणे कसोटी मालिकेच्या तुलनेत एकदिवसीय मालिकेमध्ये वेस्ट इंडिज अधिक आव्हानात्मक वाटत आहे. पांढऱ्या चेंडूने खेळताना विंडीजचे खेळाडू गुवाहाटी आणि काल विशाखापट्टणम येथे चांगलेच बिनधास्त जाणवले. बुधवारी तर पाहुणा संघ विजय खेचून नेण्याच्या जवळपास पोहोचलाच होता.
शिमरोन हेटमायर तसेच शाय होप या युवा फलंदाजांनी दिलेल्या चिवट झुंजीने मी फार प्रभावित झालो. सकारात्मक वृत्ती राखून मुक्तपणे फटके बाजी करणाºया या युवा फलंदाजांचे ताकदवान फटके थेट सीमारेषेचा वेध घेताना दिसले. त्यांनी आतापर्यंत मारलेले षटकारही स्वैर फलंदाजीची साक्ष देतात. खेळपट्ट्या पाटा आहेत, हे मान्य केले तरी विंडीजचे खेळाडू भारतीय गोलंदाजीविरुद्ध धावा काढत आहेत, हे सत्य नाकारता येणार नाही. यादृष्टीने त्यांच्या आत्मविश्वासाला दाद द्यावीच लागेल.
विशाखापट्टणमला दवबिंदूचा त्रास होईल, हे माहिती असताना व तीन फिरकीपटू असताना विराटने फलंदाजी घेतली याचे आश्चर्य वाटले. दडपणातही आपले फिरकीपटू वर्चस्व गाजवतील, अशी त्याची धारणा झाली असावी. मालिका तर भारत जिंकत आहेच पण विश्वचषकासाठी संघ बांधणी करताना गोलंदाजांची ही परीक्षा आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.
दुसरी लढत टाय झाल्याने विंडीजची निराशा झाली असेल. हेटमायर व पॉवेल बाद झाल्यानंतर जेसन होल्डरने अनेक चेंडू निर्धाव सोडून दिल्याने दडपण वाढले होते. ४८ व्या षटकात युझवेंद्र चहलने केवळ २ धावा दिल्याने भारताला पराभव टाळता आला, असे मला वाटते.
गुवाहाटीचा निकाल एकतर्फी तर विशाखापट्टणमचा थरारक होता. विराटने अवघ्या २०५ खेळीत १० हजार धावांचा पल्ला गाठून आपण उत्कृष्ट का, हे सिद्ध केले. विराट-रोहित यांना गुवाहाटीत पारंपरिक फटके मारताना पाहणे मनोरंजक होते. रोहित फटकेबाजीसाठी थोडा वेळ घेतो, पण एकदा तो सेट झाला की त्याला थांबविणे कठीण होते. रोहितकडे प्रत्येक चेंडू टोलविण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. आधुनिक क्रिकेटमध्ये रोहित-विराट यांची फटकेबाजी पाहणे विलक्षण पर्वणीच ठरते.