Virat Kohli RCB Captaincy IPL 2025: इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका संपली. आता ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी अशा दोन स्पर्धांमध्ये टीम इंडियाचे खेळाडू दिसणार आहेत. त्यानंतर मात्र भारताचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील म्हणजेच भारतीय खेळाडू IPL 2025 मध्ये खेळताना दिसतील. या टी-२० लीगचा नवीन हंगाम २१ मार्चपासून सुरू होईल. या हंगामाआधी चाहत्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे नेतृत्व कोण करेल? आरसीबीच्या कर्णधाराचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीची जबाबदारी घेऊ शकतो अशा बातम्या अनेक चालवल्या गेल्या आहेत. त्या बातम्यांना पुन्हा एकदा वेग येत आहे. या प्रकरणावर संघाकडून एक महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे.
कोहली पुन्हा RCB चा कर्णधार होणार?
चाहत्यांचा असा विश्वास आहे की, कोहली पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व करू शकतो. पण याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले गेलेले नाही. फाफ डु प्लेसिसला करारमुक्त केल्यानंतर संघाच्या पुढील कर्णधाराचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. यादरम्यान, आरसीबीच्या कर्णधारपदाच्या प्रश्नावर आरसीबीचे सीओओ राजेश मेनन यांनी स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले की, सध्या आम्ही काहीही निर्णय घेतलेला नाही. आमच्या संघात अनेक लीडर आहेत. कर्णधारपद सांभाळू शकतील असे ४-५ खेळाडू आहेत. त्यामुळे काय निर्णय घ्यावा याबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही विचार करू आणि निर्णय घेऊ.
कोहलीने १४३ सामन्यांत केले RCB चे नेतृत्व
आयपीएलच्या सुरुवातीपासूनच विराट कोहली RCB मध्ये खेळतोय. त्याने अनेक वर्षे या संघाचे नेतृत्व केले. २०११ मध्ये त्याला पहिल्यांदाच संघाची जबाबदारी मिळाली. २०१३ मध्ये तो पूर्णवेळ कर्णधार बनला. २०२१ पर्यंत तो या संघाचा कर्णधार होता. यानंतर त्याने कर्णधारपद सोडले. डू प्लेसिसच्या अनुपस्थितीतही विराटने काही सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. असे त्याने एकूण १४३ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व केले. विराटच्या RCB ने १४३ पैकी ७० सामने गमावले आणि ६६ सामने जिंकले. पण कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB ला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. २०१६ मध्ये RCB ने अंतिम सामना खेळला पण त्यात ते सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाले.