Join us  

मुंबई इंडियन्स नव्या All Rounder ला पदार्पणाची संधी देणार? गाजवलंय देशांतर्गत क्रिकेट

आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा Mumbai Indians चा संघ आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याचं ऐकणार आहे...

By स्वदेश घाणेकर | Published: March 16, 2024 3:03 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या पर्वाला २२ मार्चपासून गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने सुरुवात होत आहे. आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा Mumbai Indians चा संघ आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याचं ऐकणार आहे... गुजरात टायटन्सकडून MI फ्रँचायझीने या खेळाडूला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले आणि कर्णधारपद दिले. मुळात हार्दिकनेच अशी अट ठेवली होती की, कर्णधारपद देत असाल तर मुंबईकडे परत येतो, अशी चर्चा आहे. फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नसला, तरी हे सत्य स्वीकारणे त्यांना भाग आहे. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्याच पर्वात ( २०२२) आयपीएल जेतेपद पटकावले आणि २०२३ मध्ये त्यांना उपविजेतेपदापर्यंत समाधान मानावे लागले. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ( २०१३, २०२५, २०१७, २०१९ व २०२० ) पाच जेतेपद पटकावली आहेत. पण, आता कर्णधारपदाचा भार हलका झाल्याने फलंदाज म्हणून त्याच्याकडून आणखी आक्रमक फटकेबाजी अपेक्षित आहे. त्यात हार्दिक कर्णधार झाल्याने संघात बदलही पाहायला मिळू शकतो. हार्दिकमुळे संघात एक ऑल राऊंडर निश्चित झाला आहे, परंतु यंदाच्या पर्वात MI एका नव्या २७ वर्षीय ऑल राऊंडरला पदार्पणाची संधी देऊ शकतात.

मुंबईचा पोरगा शाम्स मुलानीची होणार एन्ट्री?

लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाज शाम्स मुलानी याला यंदाच्या पर्वात संधी मिळू शकते. रणजी करंडक स्पर्धेत २०२२-२३च्या पर्वात त्याने सर्वाधिक ४६ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यामुळे त्याला बीसीसीआयने माधवराव सिंधीया पुरस्काराने गौरविले होते. महान फिरकीपटू आर अश्विन याने हा पुरस्कार त्याला दिला होता. मुंबईच्या संघाने रणजी करंडक २०२४ मध्ये जेतेपद पटाकवले आणि त्यात शाम्स मुलानीने ३५ विकेट्स व ३५३ धावांचे योगदान देऊन सिंहाचा वाटा उचलला होता. 

२०२२-२३च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने १० सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या होत्या. रणजी ट्रॉफीच्या २०२१-२२ च्या हंगामात तो सर्वोत्तम अष्टपैलू व सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला होता. आता तो आयपीएल पदार्पणासाठी सज्ज आहे. मुलानीची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी मुंबई इंडियन्सला यंदाच्या पर्वात फायद्याची ठरू शकते. 

मुंबई इंडियन्सचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन संघ - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, डेवॉल्ड ब्रेव्हिस, जेसन बेहरेनडॉर्फ, नेहाल वढेरा/ शाम्स मुलानी, रोमारिओ शेफर्ड, टीम डेव्हिड

मुंबई इंडियन्स - हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद

मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक     

  • २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  • १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्स