आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केले. गुणतालिकेत आरसीबीचा संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यांचे प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ निश्चित झाले. चाहत्यांना आशा आहे की, यावेळी असे काहीतरी घडेल जे आयपीएलच्या इतिहासात कधीही घडले नाही. म्हणजेच आरसीबी संघ यंदा आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरेल, असा दावा चाहत्यांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरसीबीच्या एका चाहत्याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे.
आरसीबीच्या दमदार कामगिरीदरम्यान त्यांच्या एका चाहताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत एक व्यक्ती आरसीबीची जर्सी घालून उभा आहे. या व्यक्तीला तू आरसीबीचा चाहता आहेस का? असे विचारले जाते. यावर ती व्यक्ती म्हणते की, 'हो, मी आरसीबीचा चाहता आहे आणि यावेळी आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकली नाहीतर, मी माझ्या बायकोला घटस्फोट देईन.'
व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाहा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आरसीबीच्या चाहत्यांना ट्रोल केले. या व्हिडीओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, 'आतापासूनच वकील शोधायला सुरुवात करा, कारण यंदाही आरसीबी आयपीएल जिंकणार नाही.' दुसऱ्या व्यक्तीने असे म्हटले आहे की, आरसीबीने विजेतेपद जिंकू नये, अशी त्याच्या पत्नी प्रार्थना करत असेल.
आरसीबीची कामगिरीआरसीबीने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आरसीबीने यंदाच्या हंगामात ११ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले आहेत. त्यांना आणखी तीन साखळी सामने खेळायचे आहेत. यावर्षी आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बॅटमधूनही खूप धावा बसरल्या आहेत. विराटकडे ऑरेंज कॅप असून त्याने ११ सामन्यात ५०५ धावा केल्या आहेत. याशिवाय, पर्पल कॅपच्या यादीतही आरसीबीचा आघाडीचा गोलंदाज जोश हेजलवूड अव्वल स्थानी आहे. त्याने १० सामन्यात १८ विकेट्स घेतल्या आहेत.