Join us

मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

शतक शंभर धावांनी हुकलं.... इथं पाहा अंपायरची व्हायरल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:49 IST

Open in App

Mohammad Rizwan Bowled Viral Video : वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली. २९४ धावांचा पाठलाग करताना पाकचा संघ अवघ्या ९२ धावांत आटोपला. संघातील पाच जणांना खातेही उघडता आले नाही. यात कर्णधार मोहम्मद रिझवानचाही समावेश आहे. जेडन सील्स याच्यासमोर पाक कर्णधारावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. कहर म्हणजे तो चेंडू सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला. विकेट गमावल्यावर त्याची रिअ‍ॅक्शन बघण्याजोगी होती. असं कसं झालं, असा काहीसा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसून आला. यावर पंचांनी त्याची खिल्ली उडवल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 अंपायरने उडवली पाक कॅप्टनची खिल्ली

वेस्ट इंडिज संघाने १९९१ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध वनडे मालिका जिंकलीये. एका बाजूला पाकिस्तान संघाची फजिती झाली असताना दुसऱ्या बाजूला इंग्लिश अंपायरनं पाक कर्णधार मोहम्मद रिझवानची खिल्ली उडवल्याची गोष्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. रिचर्ड केटलबोरो (Richard Kettleborough) यांनी मोहम्मद रिझवान बोल्ड झाल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवरुन शेअर केलाय. या पोस्टला  दिलेल्या कॅप्शनसह अंपायरनं रिझवानला ट्रोल केल्याचे दिसते. 

"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप

नेमकं काय घडलं?  

वेस्ट इंडिजच्या संघानं ठेवलेल्या २९५ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. जेडन सील्स याने सॅम अयूब आणि अब्दुलाह शफीक या दोन्ही सलामीवीरांना खाते न उघडता तंबूचा रस्ता दाखवला. ३ बाद ८ अशी अवस्था असताना कर्णधार मोहम्मद रिझवान फलंदाजीसाठी आला. जेडन सील्स घेऊन आलेल्या तिसऱ्या षटकातील पाचवा चेंडू त्याने न खेळता सोडण्याचा निर्णय घेतला. पण चेंडू टप्पा पडल्यावर आत आला अन् ऑफ स्टंपच्या बेल्सवर लागला. इनस्विंग चेंडू ओळखायला रिझवान फसला अन् त्याच्यावर खातेही न उघडता पहिल्याच चेंडूवर तंबूत परतण्याची वेळ आली.

इथं पाहा अंपायरची व्हायरल पोस्ट

विकेट गमावल्यावर रिझवान आश्चर्यचकित झाल्याचे दिसून आले. यावर पंच रिचर्ड केटलबोरो यांनी रिझवानची फिरकी घेतली. रिझवानचं शतक १०० धावांनी हुकलं. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून वाटतंय की, तो ९९ धावांवर बाद झालाय, अशी कमेंट करत इग्लिश अंपायरनं रिझवानची खिल्ली उडवलीये. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

टॅग्स :पाकिस्तानवेस्ट इंडिजव्हायरल व्हिडिओ