- मतीन खान
स्पोर्ट्स हेड- एव्हीपी लोकमत पत्रसमूह
रोहित शर्माच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सफेद चेंडूच्या प्रकारात भारताची कामगिरी फारच शानदार झाली. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यापर्यंत भारतीय संघ अपराजित राहिला. अंतिम लढत गमावल्याने जेतेपदापासून वंचित राहिलेल्या भारतीय संघाने नंतर २०२४ च्या टी-२० विश्वचषकात आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. २००७ नंतर टी-२० विश्वचषक आणि २०१३ नंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ रोहितच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वात आणि शैलीदार फलंदाजीमुळेच संपुष्टात येऊ शकला. त्यामुळे प्रश्न पडतो की, रोहितकडून एकदिवसीय संघाचे नेतृत्व का काढून घेण्यात आले? ती जबाबदारी शुभमन गिलकडे का सोपवण्यात आली? खरेतर, भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधार बदलणे काही नवीन बाब नाही; यामागे अनेक कारणे असू शकतात...
ही भारतीय क्रिकेटची आहे जुनी परंपरा...
१९८३ सालची गोष्ट आहे. अवघ्या २३ वर्षांच्या कपिल देव यांच्याकडे पूर्णवेळ कर्णधारपद सोपविण्यात आले. त्यांच्या नेतृत्वातील भारतीय संंघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला. दोन वेळा विश्वविजेता आणि अपराजित असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने त्यावेळी एकच वनडे जिंकला. पण, त्या एकमेव विजयाने भारतीय संघाचे मनोबल प्रचंड उंचावले. हाच तो आत्मविश्वास होता, ज्याच्या जोरावर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ चा विश्वचषक जिंकला. अंतिम फेरीत पुन्हा वेस्ट इंडिजलाच नमवले.
पण बघा, भारतीय क्रिकेटचा खेळ. १९८३ मध्ये विश्वचषक जिंकवून देणारे कपिल देव यांना केवळ वर्षभरातच कर्णधारपदाहून दूर सारण्यात आले. १९८३-८४ मध्ये वेस्ट इंडिज संघ भारतात आला. त्यांनी भारताला कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-३ आणि वनडे मालिकेत ०-५ ने हरवले. याच क्षणापासून कपिल देव यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. काहीच दिवसांत त्यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी १९८४ मध्ये सुनील गावसकर पुन्हा कर्णधार बनले.
मुख्य कारणे आणि विश्लेषण...
१. कामगिरी : जर संघाची कामगिरी खराब असेल, तर कर्णधार बदलला जाऊ शकतो. पण, रोहितच्या नेतृत्वात संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यामुळे हे कारण योग्य ठरत नाही.
२. वैयक्तिक कारण : कधी कधी कर्णधार आणि संघ व्यवस्थापनामधील मतभेद किंवा वैयक्तिक कारणांमुळेही नेतृत्वात बदल होऊ शकतो. मात्र, यासंदर्भात आतल्या गोष्टी बाहेर आलेल्या नाहीत.
३. भविष्यातील योजना : संघ व्यवस्थापन आगामी योजनांच्या दृष्टीने नवा कर्णधार नेमू शकते. रोहितच्या उचलबांगडीबाबत हेच एकमेव तर्कसंगत कारण वाटत आहे.
संपूर्ण खेळ निवडकर्त्यांचा...
कहाणी कपिलची असो वा रोहितची - दोन्ही वेळा सूत्रे निवडकर्त्यांच्या हातात होती. मोहम्मद कैफ म्हणतो, त्याप्रमाणे, ‘रोहितने भारतीय क्रिकेटसाठी १६ वर्षे दिली आहेत. आपण त्याला अजून एक वर्ष कर्णधार म्हणून दिले असते, तर? रोहितने २०२७ च्या वनडे विश्वचषकातही नेतृत्व केले असते. पण, आपण रोहितचे योगदान विसरलो आणि निवडकर्त्यांच्या पसंतीसमोर त्याचे योगदान अगदी फिके पडले.’
रोहित आणि कपिलसाठी साहिर लुधियानवी यांची ही ओळ तंतोतंत लागू पडते...
तुम अगर भूल भी जाओ तो ये हक हैं तुम को,
मेरी बात और हैं मैंने तो मोहब्बत की हैं !