Join us

बळीचा बकरा हनुमा विहारीच का?

केपटाऊनमध्ये होणाऱ्या या लढतीत संघ संयोजनाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 08:40 IST

Open in App

राम ठाकूर

जोहान्सबर्ग कसोटीत भारतीय संघाचा झालेला पराभव हा भारतीय थिंक टँकसाठी चिंतेचा कारण बनला आहे. मात्र, जेव्हा पराजय होतो तेव्हा कमकुवत बाबींना टार्गेट केले जाते. ११ जानेवारीपासून तिसऱ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याच्या अंतिम एकादशबद्दल चर्चा सुरू आहे.

केपटाऊनमध्ये होणाऱ्या या लढतीत संघ संयोजनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. या महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे. मात्र, त्यासाठी कुणाला बाहेर केले जाईल, तर त्याचे उत्तर खूपच सरळ आहे, हनुमा विहारी. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र, द्रविड यांनी हा निर्णय जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या डावानंतरदेखील घेतला असता. जेव्हा भरवशाचा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे स्वस्तात तंबूत परतले होते. नक्कीच, हे दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. मात्र, सोबतच संघाचे भविष्यदेखील लक्षात घेतले पाहिजे. युवा खेळाडूंकडे लक्ष देणे गरजेचे आहे. द्रविड यांच्यासाठी कोणत्याही खेळाडूसाठी केलेले वक्तव्य हे सामान्य राहिले असते. मात्र, हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांच्या कारकीर्दीबाबत त्यांची टिप्पणी विपरीत परिणाम करू शकते.

हे प्रकरण फक्त एखाद्या खेळाडूच्या समर्थनाचे नाही. विहारी याने वेळोवेळी कठीणप्रसंगी त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे, तसेच या दौऱ्याच्या आधी त्याला भारत ‘अ’ संघासोबत दक्षिण आफ्रिकेला पाठवले होते. त्याला सांगण्यात आले होते की, तेथील परिस्थितीनुरूप तो स्वत:त बदल करू शकेल. आणि त्याच्या उपयोगी खेळाने (२५, ५४, ७२, ६३, १३) यांनी ते सिद्धदेखील केले. एकूणच काय तर भारतीय क्रिकेटच्या कर्त्याधर्त्यांना या बाबींचे लक्ष ठेवावे लागेल की, त्यांच्या निर्णयांनी वरिष्ठ खेळाडूंचे लक्ष ठेवताना युवा आणि प्रतिभावान खेळाडूंचे मनोबल तुटू नये.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App