Join us  

छा गए गुरू... सिद्धूपाजींच्या 'पाकिस्तान दौऱ्या'ला विरोध का करायचा?

नवज्योत सिंग सिद्धू याचे कौतुक करावे असे त्याच्याकडून २ ऑगस्ट २०१८ पूर्वी काही घडले असेल याची कल्पना नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: August 03, 2018 2:43 PM

Open in App

नवज्योत सिंग सिद्धू याचे कौतुक करावे असे त्याच्याकडून २ ऑगस्ट २०१८ पूर्वी काही घडले असेल याची कल्पना नाही. कदाचित त्याने भारतीय क्रिकेट संघाला अनेक कठीण प्रसंगातून तारले असेल. संसदेत भारतीयांच्या हिताची अनेक प्रश्न पोटतिडकीने मांडली असतीलही. पण गुरुवारी त्याने जे केले त्याचे कौतुक नक्की करावे लागेल. 

सिद्धूने पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या (आदरार्थी कारण ते आता पंतप्रधानपदावर विराजमान होणार आहेत) शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले. त्याचसोबत खेळाडू म्हणून इम्रान किती महान आहेत हे सांगताना खेळाडू लोकांना एकत्र आणतात. भौगोलिक सीमांची बंधनं मोडून माणसांना एकत्र आणण्याचं कौशल्य खेळाडूंकडे असतं, अशी स्तुतिसुमने उधळली. सिद्धूनं हे मत पंजाब राज्यातील सत्तधारी पक्षातील मंत्री म्हणून नाही तर माजी खेळाडू म्हणून व्यक्त केलंय असं सध्या तरी गृहीत धरूया. 

पाकिस्तानचा सर्वात यशस्वी कर्णधार, जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आणि आता पाकिस्तानातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व मुत्सद्दी राजकारणी असलेल्या इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने सार्वत्रिक निवडणूक  जिंकली. तेथून चर्चा सुरू झाली ती त्यांच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याची आणि शपथविधीला कोणा कोणाला आमंत्रण मिळेल याची. खान याचे पंतप्रधानपदी विराजमान होणे हे भारतासाठी तितके चांगले नाही. त्यामुळे ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

पण उल्लेखनीय बाब म्हणजे इम्रान राजकारणात उतरले तेव्हापासून त्यांनी स्वतःमधील खेळाडू कधी मरू दिला नाही. याची प्रचिती वारंवार आलीच होती, ती या निवडणुकीनंतर पुन्हा अनुभवयास मिळाली. कोणत्याही देशाच्या अगदी महासत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत कोणालाही खान यांनी सद्यस्थितीत तरी शपथविधीसाठी निमंत्रण पाठवलेले नाही. त्यांनी प्राधान्य दिले ते समकालीन खेळाडू आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांना. येथेच खान यांच्यातला खेळाडू जिवंत असल्याचे दिसून आले. 

भारताचा माजी कसोटीपटू सिद्धू याने ते निमंत्रण स्वीकारले म्हणून त्याचे कौतुक. आता स्वयंघोषित देशप्रेमी सिद्धूवर टीका करतील. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध लक्षात घेता, ती टीका रास्त आहे. पण, टीका करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की खान यांनी एक समकालीन खेळाडू मित्र म्हणून कपिल देव, सुनील गावस्कर आणि सिद्धू यांना आग्रहाचे निमंत्रण पाठवले आहे. त्यात देशभक्त व देशद्रोहाचा मुद्दा येतच नाही. त्यामुळे त्यांच्यावर होत असलेली टीका निरर्थक ठरते. कुणालाही कल्पना न देता आडवळण घेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानात जाणे ज्यांना पटते, त्यांनी तरी जातीय तेढ निर्माण करणारी विधान करू नये. गावस्कर, कपिल देव यांना पाकिस्तानात जाण्यापासून रोखणारे आम्ही कोण? हा प्रश्न त्यांनी आधी स्वतःला विचारावा.

टॅग्स :इम्रान खानक्रिकेटराजकारणक्रीडा