इंग्लंड संघाने लॉर्ड्स कसोटी सामना जिंकला असला तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने संघाला मोठा दंड ठोठावला आहे. इतकेच नाही तर भारताविरुद्ध विजय मिळवूनही इंग्लंड संघाच्या खात्यातून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गुणही कापण्यात आले. आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी इंग्लंडला मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच, संघाच्या खात्यातून दोन डब्ल्यूटीसी पॉइंटही कमी केले. यानंतर इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी ६६.६७ वर घसरली. शिवाय, इंग्लंडच्या संघाची दुसऱ्या स्थानावरून तिसर्या स्थानावर घसरण झाली.
आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी इंग्लंड संघाला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरवले. इंग्लंडने दोन षटके उशिरा टाकली, ज्यासाठी आयसीसीने संपूर्ण संघाला दंड ठोठावला. आयसीसीच्या खेळाडू आणि खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, खेळाडूंना निर्धारित वेळेत टाकण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावला जातो. इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी सामन्यात निर्धारित वेळेत दोन षटके टाकली नाहीत म्हणून त्यांना १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने चूक मान्य करून दंड स्वीकारला. त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती. फील्ड पंच पॉल रीफेल आणि शराफुद्दौला इब्ने शाहिद, तिसरे पंच अहसान रझा आणि चौथे पंच ग्रॅहम लॉईड यांनी इंग्लंडविरुद्ध हे आरोप लावले. आरोप सिद्ध झाल्यानंतर इंग्लंडच्या संघाला दंड ठोठावण्यात आला. भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतलेल्या इंग्लंडच्या विजयाची टक्केवारी ६६.६७ इतकी झाली होती. परंतु, आता ती ६० टक्के इतकी झाली.