Asia Cup 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुचवलेला हायब्रिड मॉडल अखेर मान्य झाला अन् आशियाई क्रिकेट परिषदेने स्पर्धेची तारीख जाहीर केली. ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषक पाकिस्तान व श्रीलंका या दोन देशांत खेळवला जाणार आहे. यजमानपद जरी पाकिस्तानकडे असले तरी तेथे केवळ ४ लढती होतील, तर उर्वरित ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. India vs Pakistan ही लढतही श्रीलंकेत होईल. आशिया चषकाचा तिढा सुटल्याने आता पाकिस्ताननेही वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येण्याची आणि भारताविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्याची तयारी दर्शवली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरुवातीला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यास नकार दिल्याचे वृत्त होते. पण, १५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. मात्र, यावरून आता शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) PCB वर टीका केली आहे. अहमदाबाद येथे खेळण्यास नकार देण्याचे कारणच काय, असा सवाल करत आफ्रिदी म्हणाला, अहमदाबाद येथे खेळण्यास आपण का नकार देतोय? ती खेळपट्टी आग ओकते की ती झपाटलेली आहे?
एका मीडिया रिपोर्टनुसार, ICC अधिकारी नुकतेच पाकिस्तानला गेले होते, तेव्हा PCB च्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नजम सेठी यांनी त्यांना सांगितले की पाकिस्तानचे बाद फेरीचे सामने अहमदाबादमध्ये होऊ नयेत. पीसीबीच्या एका वरिष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघाला पाकिस्तान सरकारकडून भारतात जाण्याची परवानगी मिळाल्यास त्यांनी आयसीसीला चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता येथे त्यांचे सामने आयोजित करण्याची विनंती केली."