ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग केवळ माणसांनाच का होतो?; धोनीच्या लेकीचा प्रश्झिवा आणि साक्षी धोनीचा संवाद सोशल मीडियावर चर्चेतकोरोनाबद्दल झिवाचे भाबडे पण महत्त्वाचे प्रश्न
कोरोनानं घातलेल्या थैमानामुळे संपूर्ण जगात दहशत पसरलीय. जगभरात २ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून जवळपास ९ हजार जणांना जीव गमवावा लागलाय. कोरोनामुळे जगभरातल्या अनेक क्रीडा स्पर्धा, मालिका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे क्रीडापटू त्यांच्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीदेखील याला अपवाद नाही. कोरोनाबद्दल धोनीची लेक झिवानं तिच्या आईला विचारलेले प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
कोरोनाची सध्या सर्वांनीच धास्ती घेतलीय. अगदी लहान मुलांच्या तोंडूनही हा शब्द ऐकू येतोय. धोनीची लाडकी लेक झिवादेखील याला अपवाद नाही. झिवानं कोरोनाबद्दल विचारलेले प्रश्न तिची आई साक्षीनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कोरोनाचा संसर्ग केवळ माणसांनाच का होतो? प्राण्यांना त्याची बाधा का होत नाही?, असे प्रश्न झिवानं तिच्या आईला विचारलेत. त्यावर निसर्ग माणसांवर नाराज असल्याचं उत्तर साक्षीनं दिलं.
आपण काही चुकीचं केलंय का? निसर्ग आपल्यावर रागवलाय? असे भाबडे प्रश्न झिवानं आईला विचारले. त्यावर निसर्ग सध्या आपल्याला शिक्षा देतोय. आपण त्याची काळजी घ्यायला हवी. कचरा कचरापेटीतच टाकायला हवा. पाणी आणि अन्न वाया घालवायला नको. आपण झाडं लावायला हवीत, असं उत्तर साक्षीनं छोट्या झिवाला दिलंय. आईचं उत्तर ऐकून मी हे सगळं नक्की करेन. मग निसर्गाला बरं वाटेल ना? त्याला आनंद होईल ना? मग तो मला गिफ्ट देईल का?, असे निरागस प्रश्न झिवानं विचारले. यावर हो नक्की. निसर्ग तुला भरभरून प्रेम देईल, असं छान उत्तर साक्षीनं झिवाला दिलंय.
आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यानं महेंद्रसिंह धोनी चेन्नईहून रांचीला पोहोचलाय. आयपीएलमधल्या आठही संघ मालकांनी त्यांचे ट्रेनिंग कॅम्प रद्द केले आहेत. आयपीएलसाठी धोनी काही दिवसांपूर्वीच चेन्नईत दाखल झाला. त्यानं काही सराव सामन्यांमध्येही सहभाग घेतला. कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.