Join us  

बाबो... संपूर्ण संघ केवळ ७ धावांत गारद

रोहित शर्माच्या शाळेने मिळवला विक्रमी विजय; मीत मयेकरचा नाबाद त्रिशतकी तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 8:52 PM

Open in App

मुंबई : शालेय क्रिकेटमधील बलाढ्य संघ असलेल्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने (एसव्हीआयएस) प्रतिष्ठेच्या हॅरिश शिल्ड आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत विक्रमी विजय मिळवताना अंधेरीच्या चिल्ड्रन्स वेल्फेअर संघाचा तब्बल ७५४ धावांनी फडशा पाडला. विशेष म्हणजे या सामन्यात चिल्डेÑन वेल्फेअरच्या कोणत्याही फलंदाजाला धावांचे खाते उघडता आले नाही. एसव्हीआयएसच्या मीत मयेकरने प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी फोडताना केवळ १३४ चेंडूत नाबाद ३३८ धावांचा तडाखा दिला.एन्यू एरा, आझाद मैदान येथे सुरु असलेल्या एमएसएसए १६ वर्षांखालील हॅरिस शिल्ड आंतर शालेय स्पर्धेचे यंदाचे १२६ वे सत्र आहे. विशेष म्हणजे एसव्हीआयएस शाळेतूनच भारताला हिटमॅन रोहित शर्मा लाभला. रोहितचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याच मार्गदर्शनाखाली खेळताना एसव्हीआयएस संघाने विक्रमी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना एसव्हीआयएसने ४५ षटकात ४ बाद ७६१ धावांचा एव्हरेस्ट उभारला. मीत मयेकर याने तुफानी फटकेबाजी करताना १३४ चेंडूत ५६ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ३३८ धावांचा तडाखा दिला. याशिवाय क्रिष्णा पार्ते (९५) आणि इशान रॉय (६७) यांनी फटकेबाजी करताना वेल्फेअर संघाला मजबूत चोप दिलाया भल्यामोठ्या धावसंख्येचे ओझे वेल्फेअर संघाला झेपलेच नाही. मानसिकरीत्या खच्चीकरण झालेल्या त्यांच्या एकाही फलंदाजा भोपळा फोडता आला नाही. एसव्हीआयएसच्या गोलंदाजांनी दिलेल्या ७ अवांतर धावांमुळे वेल्फेअर संघाच्या धावांचे खाते उघडले. भेदक गोलंदाजीपुढे वेल्फेअर संघाचा डाव केवळ ७ धावांत संपुष्टात आला आणि एसव्हीआयएस संघाने तब्बल ७५४ धावांनी विक्रमी विजयाची नोंद केली. अलोक पाल याने ३ धावांत ६, तर वरद वझे याने ३ धावांत २ बळी घेत वेल्फेअर संघाची दाणादाण उडवली.

टॅग्स :मुंबईशाळा