Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण मारणार अंतिम फेरीत धडक? ईडन गार्डन्सवर महासंग्राम : दक्षिण आफ्रिका–न्यूझीलंड निर्णायक लढतीसाठी झाले सज्ज

T20 World Cup 2026 Semifinal 1:

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 04:58 IST

Open in App

कोलकाता : दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड बुधवारी येथे टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध भिडतील. या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेची भक्कम फलंदाजी विरुद्ध न्यूझीलंडची दमदार गोलंदाजी असा हा रोमांचक सामना रंगेल. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मारक्रम आणि न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे ईडन गार्डन्सवर होणारी कर्णधारांमधील ही लढत हजारो प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरेल. २०१५ च्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नाट्यमयरीत्या पराभूत केले होते. त्या पराभवामुळे डेल स्टेन आणि एबी डीव्हिलियर्स यांसारख्या खेळाडूंना मोठा धक्का बसला होता आणि आयसीसी स्पर्धांतील या दोन संघांतील स्पर्धाही शिगेला पोहोचली होती.

दक्षिण आफ्रिकेचा संघ आता अधिक धोकादायक बनला आहे. गेल्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकत त्यांनी आपली जिद्द दाखवली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अद्याप त्यांना मोठे विजेतेपद मिळाले नसले, तरी चोकर्सचा शिक्का आता त्यांच्या प्रतिमेशी जोडला जात नाही. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे, दोन्ही संघांचे कर्णधार रणनीती आणि तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असूनही त्यांना हवी तितकी प्रसिद्धी मिळालेली नाही.  दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेत अद्याप एकही पराभव पत्करलेला नसून न्यूझीलंडला या संघाविरूद्ध सर्वोत्तम खेळ करावा लागेल. 

धडाकेबाज फलंदाजांपुढे दमदार फिरकीपटूंचे आव्हानमारक्रम या स्पर्धेत १७५ हून अधिकच्या स्ट्राइक रेटने २६८ धावा केल्या आहेत. पॉवरप्लेमध्ये त्याने गोलंदाजांवर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे, सँटनरने ६.३५ च्या इकॉनॉमी रेटने फलंदाजांना जखडवून ठेवत त्याने फलंदाजीमध्येही महत्त्वपूर्ण योगदान दिले.मारक्रम, क्विंटन डीकॉक, डेवाल्ड ब्रेविस, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर आणि मार्को यान्सेन यांसारख्या दमदार फलंदाजांनी सजलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ कोणत्याही प्रतिस्पर्ध्याची झोप उडवू शकतो.न्यूझीलंडकडे सँटनरसह रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स आणि कोले मॅककाँशी यांसारखे प्रभावी फिरकीपटू आहेत. भारताव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेला प्रथमच इतक्या सक्षम फिरकी आक्रमणाचा सामना करावा लागणार आहे. न्यूझीलंडकडे दर्जेदार लेगस्पिनरची उणीव जाणवते. कारण, ईश सोढीने आतापर्यंत विशेष प्रभाव पाडलेला नाही.

द्विशतकाचा होणार प्रयत्नईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल मानली जाते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका लक्ष्याचा पाठलाग करण्यास प्राधान्य देईल, तर न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना २०० हून अधिक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. फिन ॲलन, टिम सीफर्ट, ग्लेन फिलिप्स आणि डेरिल मिचेल यांच्यावर न्यूझीलंडची मोठी जबाबदारी असेल.या खेळपट्टीवर लुंगी एनगिडीच्या संथ चेंडूंची परिणामकारकता आणि त्याच्या वाइड यॉर्कर व लेग कटर न्यूझीलंडच्या फलंदाजांना कितपत रोखू शकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. न्यूझीलंडसाठी लोकी फर्ग्युसनची गोलंदाजीही तितकीच निर्णायक ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : South Africa and New Zealand clash for final spot in Kolkata.

Web Summary : South Africa faces New Zealand in a crucial semi-final. Key battle: South Africa's batting versus New Zealand's bowling. Captains Marakram and Santner are in top form. South Africa seeks to continue their unbeaten streak, while New Zealand aims for a 200+ score.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६