Join us

कोण आहे रोहित शर्माची विकेट काढणारा ६.४ फूटी उंच गोलंदाज उमर नझीर? १३ चेंडूत दिल्या ० धावा

Umar Nazir vs Rohit Sharma, Ranji Trophy : उमरने केवळ रोहित शर्माच नव्हे तर अजिंक्य रहाणे, शिवम दुबेलाही बाद केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:14 IST

Open in App

Umar Nazir vs Rohit Sharma, Ranji Trophy : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार, एक धडाकेबाज फलंदाज आणि बडा खेळाडू अशी महती असलेला रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या सामन्यात मात्र सपशेल फ्लॉप ठरला. तब्बल १० वर्षांनी अनेक आशा उराशी बाळगून रोहित शर्मा मैदानात उतरला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्याआधी सराव म्हणून रणजी स्पर्धेकडे पाहिले जात आहे. पण रोहितला या सामन्यात काहीही कमाल दाखवता आली नाही. १९ चेंडूंचा सामना करत अवघ्या तीन धावा करून तो बाद झाला. बेजबाबदारपणे फटका खेळून हातात सोपा झेल देत रोहितने परतीची वाट धरली. जम्मूकाश्मीरच्या एका गोलंदाजाने रोहितला पूर्णपणे अडकवून टाकले आणि विकेटही काढली. जाणून घेऊया ३१ वर्षांच्या आणि ६.४ फूट उंच असलेल्या उमर नझीर बद्दल...

कोण आहे उमर नझीर?

उमर नजीर हे नाव भारतीय क्रिकेटरसिकांनी याआधी फारसे कधीच ऐकले नसेल. पण, रणजी ट्रॉफी सामन्यात त्याने रोहित शर्मासोबत जे केले, त्यावर तुम्ही त्याचे नाव नक्कीच विसरणार नाही. जम्मू-काश्मीर संघाकडून खेळणाऱ्या या गोलंदाजाने मुंबईचा स्टार फलंदाज रोहितविरुद्ध १३ चेंडूंचा मारा केला. या लढाईत उमरचा एकतर्फी विजय झाला. १३ चेंडूंपैकी एकाही चेंडूवर रोहितला एकही धाव घेता आली नाही. त्यातच भर म्हणून रोहितने त्याच गोलंदाजाच्या षटकात अतिशय विचित्र आणि बेजबाबदार फटका खेळत विकेटही देऊन टाकली.

कोण आहे उमर नझीर? कशी आहे कामगिरी?

३१ वर्षीय उमर नझीर हा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे. १९९३ मध्ये जन्मलेला उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज उमर नझीर रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीरसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफीच्या २०१८-१९ या हंगामात त्याने २८ च्या सरासरीने २६ विकेट घेतल्या. २०१९-२०च्या हंगामात त्याने २३ च्या सरासरीने २८ विकेट घेतल्या. आणि २०२२-२३च्या हंगामात त्याने रणजी ट्रॉफीमध्ये २२ च्या सरासरीने १४ विकेट्स घेतल्या होत्या. उमरने २०१३ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मुंबईविरुद्धच्या सामन्यापर्यंत खेळलेल्या ५७ सामन्यांत त्याने २९ च्या सरासरीने १३८ बळी घेतले आहेत. उमर नझीरने प्रथम श्रेणी पदार्पणानंतर अवघ्या वर्षभरात लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्यामध्ये त्याने आतापर्यंत ३६ सामन्यांत ५४ बळी घेतले आहेत.

उमरसमोर एकटा रोहित शर्माच नव्हे तर इतरही फलंदाज हतबल दिसले. उमर नझीरने भन्नाट गोलंदाजी करत रोहितपाठोपाठ अजिंक्य रहाणे आणि हार्दिक तामोरे यांसारख्या फलंदाजांच्या विकेट्सही घेतल्या.

टॅग्स :रणजी करंडकरोहित शर्माअजिंक्य रहाणेमुंबईजम्मू-काश्मीर