Amit Mishra Domestic Violence News: भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा याच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू अमित मिश्रा याची पत्नी गरिमा तिवारी हिने त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे. गरिमाने आरोप केला आहे की, अमित मिश्रा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी कार आणि १० लाख रुपयांसाठी तिच्यावर अत्याचार केले. तसेच, अमित मिश्राचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. पण त्यात ज्या क्रिकेटपटूचा फोटो वापरला जात आहे तो चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. टीम इंडियाकडून खेळलेला अमित मिश्रा वेगळा आहे, तर ज्याच्यावर आरोप केलेत तो क्रिकेटपटू अमित मिश्रा वेगळा आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
तो मी नव्हेच...
"सध्या प्रसारमाध्यमांमध्ये ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्या पाहून मी खूपच दु:खी झालो आहे. मी माध्यमांना नेहमीच आदर केला आहे, पण सध्या जी बातमी चालवली जात आहे ती जरी योग्य असली तरीही त्यासोबत माझा फोटो जोडण्यात आला आहे- ते पूर्णपणे चुकीचे आहे. संबंध नसलेल्या बातम्यांना माझा फोटो लावण्याचा प्रकार लगेच थांबवा अन्यथा मला नाईलाजाने कायदेशीर कारवाई करावी लागेल", असे ट्विट अमित मिश्राने केले.
तो 'वेगळा' अमित मिश्रा नेमका कोण?
अमित मिश्रा ज्याच्यावर त्याच्या पत्नीने आरोप केले आहेत, तो एक वेगवान गोलंदाज आहेत. हा अमित मिश्रा IPL मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स संघाचा भाग होता. पण त्याला IPL मध्ये पदार्पण करण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्यामुळे त्याची फारशी चर्चा झाली नाही. पण या अमित मिश्राने उत्तर प्रदेश संघातून खेळताना १७ प्रथम श्रेणी, १२ लिस्ट ए आणि २४ टी२० सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकूण १०२ गडी बाद केले आहेत. तसेच तो सेंट्रल झोन संघाकडूनही खेळला आहे.