Who is Nari Contractor: भारतीय क्रिकेटमधील ज्येष्ठ खेळाडू आणि माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर (वय ९२) यांना मुंबईत झालेल्या एका पुरस्कार समारंभात ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्रदान करताना माजी भारतीय फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) भावूक झाले. गावसकर म्हणाले की, नरीभाईंना हा पुरस्कार देणे, माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आम्ही त्यांच्याकडून खूप काही शिकलो. विशेषतः सलामीवीर म्हणून धैर्य म्हणजे काय, हे आम्हाला नारीभाईंकडूनच समजले.
गावसकरांना दिलेला खास सल्ला
समारंभात बोलताना गावसकर यांनी नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी दिलेला एक महत्त्वाच्या सल्ल्याची आठवण झाली. त्यांनी सांगितले की, जेव्हा एखादा फलंदाज चांगली खेळी करतो, तेव्हा त्या दिवसातील प्रत्येक गोष्ट डायरीमध्ये लिहून ठेवावी. गावसकर यांच्या मते, एखादा खेळाडू खराब फॉर्ममधून जात असताना ही डायरी वाचल्यास आत्मविश्वास पुन्हा वाढू शकतो.
लॉर्ड्स टेस्टमधील प्रेरणादायी घटना
गावसकरांनी १९५९ साली लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या कसोटी सामन्याचा उल्लेख केला. त्या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायन स्टॅटमच्या चेंडूने नारी कॉन्ट्रॅक्टर यांच्या छातीवर जोरदार प्रहार केल्याने त्यांच्या बरगड्या तुटल्या होत्या. तरीही त्यांनी मैदान सोडले नाही, जखमी अवस्थेतही ८१ धावांची शानदार खेळी केली. हा प्रसंग त्यांच्या जिद्दीचा आणि धैर्याचा उत्तम नमुना मानला जातो.
भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचे स्थान
७ मार्च १९३४ रोजी गुजरातमधील गोधरा येथे जन्मलेले नरी कॉन्ट्रॅक्टर हे डावखुरे सलामीवीर होते. त्यांनी १९५५ ते १९६२ या काळात भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले. त्यांच्या कसोटी कारकिर्दीत त्यांनी ३१ कसोटी सामन्यांमध्ये ३१.५८ च्या सरासरीने १६११ धावा केल्या. यात त्यांचे १ शतक आणि ११ अर्धशतके आहेत.
तरुण वयात भारताचे नेतृत्व
नरी कॉन्ट्रॅक्टर हे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात तरुण कर्णधारांपैकी एक होते. १९६०-६१ हंगामात अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी भारताचे नेतृत्व केले.त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीवर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असा विजय मिळवला, जो इंग्लंडविरुद्धचा भारताचा पहिला कसोटी मालिका विजय होता.
वेस्ट इंडीज दौऱ्यातील भीषण दुखापत
१९६२ मध्ये वेस्ट इंडीज दौऱ्यात बार्बाडोसविरुद्धच्या एका सामन्यात वेगवान गोलंदाज चार्ली ग्रिफीनच्या बाउंसरने नरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्यांच्या कसोटी कारकिर्दीवर जवळपास पूर्णविराम लागला. मात्र जीवघेण्या जखमेतून सावरल्यानंतर त्यांनी पुन्हा मैदानात पुनरागमन करत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास यश मिळवले.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही उल्लेखनीय कामगिरी
नरी कॉन्ट्रॅक्टर यांची फर्स्ट क्लास कारकीर्दही तितकीच प्रभावी होती. त्यांनी १३८ सामन्यांमध्ये ३९.८६ सरासरीने ८६११ धावा केल्या. यादरम्यान, त्यांनी २२ शतकेही झळकावली. तसेच १९७०-७१ रणजी ट्रॉफीमध्ये गुजरात संघाचे नेतृत्वही त्यांनी केले.
आजही क्रिकेटशी नाते कायम
सध्या नरी कॉन्ट्रॅक्टर मुंबईत वास्तव्यास असून, ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या अकादमीत युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना २००७ मध्ये कर्नल सी. के. नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. नारी कॉन्ट्रॅक्टर यांची कहाणी केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाही, तर ती धैर्य, जिद्द आणि समर्पणाची प्रेरणादायी गाथा मानली जाते.
Web Summary : Nari Contractor, 92, received a Lifetime Achievement Award. Gavaskar recalled Contractor's advice on journaling good performances. A brave batsman, Contractor showed immense courage, playing through injuries. He captained India at a young age and later coached young players.
Web Summary : 92 वर्षीय नारी कॉन्ट्रैक्टर को लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड मिला। गावस्कर ने अच्छी परफॉर्मेंस की जर्नलिंग पर कॉन्ट्रैक्टर की सलाह को याद किया। एक बहादुर बल्लेबाज, कॉन्ट्रैक्टर ने चोटों के बावजूद खेलते हुए अपार साहस दिखाया। उन्होंने कम उम्र में भारत की कप्तानी की और बाद में युवा खिलाड़ियों को कोचिंग दी।