IPL Auctioneer : आयपीएलचा लिलाव म्हटला की हैदराबाद संघाची मालकीन काव्या मारन चर्चेत आली नाही, असं होत नाही. मात्र, मंगळवारी (१६ डिसेंबर) पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या लिलावात एक चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता, तो म्हणजे मल्लिका सागर. लिलावाच्या रिंगणात आपला शांत स्वभाव आणि कमालीचा आत्मविश्वास यामुळे मल्लिका सागर आता आयपीएल लिलावाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. मात्र, कलाविश्व ते क्रीडाविश्व असा त्यांचा हा प्रवास अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे.
पुस्तकातील पात्राने बदलले नशीब
१९७५ मध्ये मुंबईतील एका व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या मल्लिका सागर यांचा लिलाव या क्षेत्राशी संबंध एका योगायोगातून आला. एका पुस्तकातील महिला लिलावकर्त्याच्या मुख्य पात्राने त्यांना इतके प्रभावित केले की, त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. ज्या काळात भारतात या व्यवसायाकडे कोणी वळत नव्हते, त्या काळात मल्लिका यांनी हे धाडस दाखवले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा
मल्लिका यांचे शिक्षण मुंबईत झाले, तर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेतील कनेक्टिकटला गेल्या. फिलाडेल्फिया येथील ब्रिन मॉर कॉलेजमधून त्यांनी 'आर्ट हिस्ट्री'मध्ये पदवी मिळवली. २००१ मध्ये त्यांनी लंडनमध्ये 'सोदबीज' या जागतिक कीर्तीच्या संस्थेसोबत कामाला सुरुवात केली. अवघ्या २६ व्या वर्षी न्यूयॉर्कमधील 'क्रिस्टीज' येथे लिलाव करणाऱ्या त्या पहिली भारतीय महिला ठरल्या, हा त्यांच्या कारकिर्दीतील एक ऐतिहासिक टप्पा होता.
क्रीडाविश्वात 'एंट्री' आणि इतिहास
अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर कलाकृतींचा लिलाव केल्यानंतर मल्लिका मुंबईत परतल्या. त्यांच्या अचूक सादरीकरणामुळे त्यांना क्रीडाविश्वाकडून विचारणा झाली. २०२१ 'प्रो कबड्डी लीग'मध्ये त्या पहिल्या महिला लिलावकर्त्या ठरल्या आणि पुरुषप्रधान क्षेत्रात आपला ठसा उमटवला. २०२३ मध्ये महिला प्रीमियर लीगच्या लिलावाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. तर २०२४-२५ मध्ये आयपीएल २०२४ मिनी ऑक्शन आणि जेद्दा येथे झालेल्या २०२५ च्या मेगा ऑक्शनचे त्यांनी यशस्वी संचलन केले.
वाचा - IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
लिलाव विश्वातील सर्वात 'भरोशाचा चेहरा'
मल्लिका सागर यांनी नुकताच डब्ल्यूपीएल २०२६ चा लिलावही पार पाडला. कला असो वा क्रिकेट, कोटींच्या बोली लावताना त्यांचा आत्मविश्वास आणि स्पष्ट संवाद खेळाडू व फ्रँचायझी दोघांनाही प्रभावित करतो. आज त्या भारतीय क्रीडा जगतातील सर्वात यशस्वी आणि विश्वासार्ह लिलावकर्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.