Join us

IPL 2023 matches: वेळेचे बंधन पाळतोय कोण ! रात्रीपर्यंत चालतात सामने...

१०:५० ला संपणाऱ्या सामन्याच्या निकालाची चाहत्यांना रात्री ११:३० पर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 08:03 IST

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मध्ये सात सामने झाले. त्यातील एकही सामना निर्धारित वेळेत संपलेला नाही. आरसीबीने मुंबईविरुद्ध घरच्या मैदानावर एका तासांत १४ ऐवजी केवळ दहा षटके टाकली. टी-२० हे झटपट क्रिकेट आहे; पण आयपीएलमध्ये हा प्रकार मंद ठरला. सायंकाळी ७:३० ला सुरू होऊन १०:५० ला संपणाऱ्या सामन्याच्या निकालाची चाहत्यांना रात्री ११:३० पर्यंत प्रतीक्षा करावी लागते. खेळाडूदेखील त्रस्त होत आहेत. आरसीबीचा जोस बटलर याने स्वत:च्या सोशल मीडियावर लिहिले,‘कृपया खेळाचा वेग वाढवा...!’ नियमानुसार सामना तीन तास २० मिनिटांत संपायला हवा. यातच इनिंग ब्रेकचा समावेश येतो. असे न झाल्यास अधिकृत प्रसारणकर्ते आर्थिक संकटात येतात.

गुजरात- सीएसके ही सलामी लढत चार तासांहून अधिक वेळ चालली.  आयसीसीच्या नियमानुसार एका तासांत १४ षटके टाकणे अनिवार्य आहे. मात्र आयपीएलमध्ये कूर्मगती गोलंदाजी हा कायम चिंतेचा विषय ठरतो. यावर तोडगा म्हणून मागच्यावर्षी पेनल्टीचा नियम आला. यानुसार ९० मिनिटांत २० षटके न टाकल्यास उर्वरित  षटकांत पाचऐवजी चारच क्षेत्ररक्षक ३० यार्डच्या बाहेर उभे राहू शकतील. याचा लाभ फलंदाजी करणाऱ्या संघाला होतो.

यंदा ही पेनल्टी केवळ लखनौला मिळाली. अन्य सामन्यात पंचांना पेनल्टीचे कारण मिळाले नसावे. त्यांच्या मते डीआरएसच्या निकालास उशीर होत असल्याने सामन्याची वेळ लांबते. २ एप्रिलला मुंबई- आरसीबी या सामन्यात आरसीबीने २० षटके टाकण्यास तब्बल १२२ मिनिटे लावली. उशिरा रात्रीपर्यंत प्रेक्षकांना जागण्याचा त्रास होऊ नये यासाठी सामन्याची वेळ ७:३० करण्यात आली आहे. अधिकृत प्रसारणकर्त्यानुसार रात्री १०:४५ नंतर टीव्ही रेटिंग कमी होते.  ११ नंतर तर यात आणखी झपाट्याने घसरण होत जाते. याचे कारण प्रेक्षक जागरण करीत सामना पाहू इच्छित नाहीत. यामुळेच रात्री ८ ऐवजी सामन्याची वेळ ७:३० वर आणण्यात आली; पण याचा काहीही लाभ होताना दिसत नाही.

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्स
Open in App