Who Is Aman Rao Perala Hyderabad Opener Double Hundred vs Bengal Vijay Hazare Trophy : हैदराबादचा सलामीवीर अमन राव याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत द्विशतकी धमाका केला आहे. मंगळवारी राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवरील बंगालविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या डावाची सुरुवात करणाऱ्या उजव्या हाताच्या फलंदाजाने डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक साजरे केले. या सामन्यात १५४ चेंडूंचा सामना करत तो १२ चौकार आणि १३ षटकारासह नाबाद राहिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बालपण अमेरिकेत गेल क्रिकेटवरील प्रेमासाठी तो पुन्हा मायदेशी परतला अन्....
२१ वर्षीय अमन राव पेराला आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हैदराबादचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अमनचा जन्म २ जून २००२ रोजी मॅडिसन, विस्कॉन्सिन (अमेरिका) येथे झाला. बालपण अमेरिकेत गेले असले तरी पालकांनी लहानपणापासूनच त्याला क्रिकेटरच्या रुपात घडवण्यास सुरुवात केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने आपल्यातील क्षमता दाखवून देत हैदराबाद संघात स्थान मिळवलं. IPL मध्ये अल्प बोली लागल्यावर या पठ्ठ्यानं वयाच्या २१ व्या वर्षी द्विशतकासह सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. बंगाल विरुद्धच्या सामन्यातील द्विशतकी खेळीसह त्याने लिस्ट-ए क्रिकेटमधील हैदराबादच्या फलंदाजाकडून सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील नववे द्विशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले.
पहिलं शतक द्विशतकात बदलले
अमनच्या दमदार खेळीच्या जोरावर हैदराबादच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित ५० षटकात ३५२ धावा केल्या. बंगालने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. अमनच्या खेळीनं त्याला हा डाव चांगलाच फसला. वरिष्ठ क्रिकेटमधील अमनचं हे पहिलंच शतक असून त्याने त्याचे दुहेरी शतकात रुपांतर करुन सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.
IPL च्या मिनी लिलावात राजस्थान रॉयलच्या संघाने लावली होती बोली
आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात अमन राव याने ३० लाख या मूळ किंमतीसह नाव नोंदणी केली होती. राजस्थान रॉयल्सच्या संघाने मूळ किंमतीसह त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. आगामी आयपीएल स्पर्धेआधी त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मोठा धमाका केल्याचे पाहायला मिळाले आहे.