२०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय क्रिकेट इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेयुवराज सिंगच्या आधी फलंदाजीला येऊन सर्वांनाच चकित केले. धोनीने केवळ संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले नाही, तर नाबाद ९१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत २८ वर्षांनी भारताला विश्वविजेते बनवले. धोनीच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामागे कोण होते, हा प्रश्न अनेक वर्षांपासून क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागने या रणनीतीचा खुलासा करत, ही कल्पना सचिन तेंडुलकरची असल्याचे सांगितले. सचिनने स्वतः रेडिटवरील एका सेशनमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आणि त्यामागची दोन मोठी कारणे सांगितली.
सचिन म्हणाला की, "डावखुरा युवराज सिंग आणि उजव्या हाताचा धोनी मैदानात आल्यास श्रीलंकेचे ऑफ-स्पिनर्स, विशेषतः मुथय्या मुरलीधरन, गोंधळून जातील. या मिश्रणामुळे गोलंदाजांना त्यांची लाईन आणि लेंथ बदलणे कठीण जाईल, ज्यामुळे भारताला फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे, मुरलीधरन चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता आणि धोनीने त्याच्यासोबत तीन हंगामात नेटमध्ये भरपूर सराव केला होता. त्यामुळे धोनीला मुरलीधरनच्या गोलंदाजीचा चांगला अंदाज होता, ज्याचा उपयोग तो सामन्यात प्रभावीपणे करू शकला." धोनीने या संधीचे सोने केले आणि ९१ धावांची मॅच-विनिंग खेळी साकारून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
या ऐतिहासिक विजयात धोनीसोबतच गौतम गंभीरचेही मोठे योगदान होते. गंभीरने ९७ धावांची शानदार खेळी केली, पण तो शतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला. त्यानंतर धोनीने संघाची जबाबदारी स्वीकारली. धोनीला त्याच्या शानदार खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले. तसेच, सचिन तेंडुलकरने या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक ४८२ धावा केल्या होत्या.