एशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा सपशेल धुव्वा उडवत विजयाचा 'सिंदूर' आपल्या माथ्यावर लावला. यानंतर बीसीसीआयने भारतीय संघासाठी तत्काळ 21 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. याचवेळी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सईद अजमल यांच्या 2023 मधील पॉडकास्टच्या एक क्लिपने सोशल मीडियावर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. या क्लिपमध्ये अजमल, 2009 च्या टी-20 विश्वचषक विजयानंतर पाकिस्त सरकारने आपल्याच खेळाडूंना कशाप्रकारे ‘चूना’ लावला होता, याचा धक्कादायक खुलासा करताना दिसत आहे.
पाकिस्तानने 2009 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. या स्पर्धेत सईद अजमलने 12 बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. विजयानंतर तत्कालीन पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांनी संघाला भेटीसाठी निमंत्रित केले होते. तेव्हा प्रत्येक खेळाडूला 25 लाख पाकिस्तानी रुपयांचा चेक गिलानी यांनी दिला होता. याचे फोटोही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. सरकार आपल्या खेळाडूंचा कसा सन्मान करत आहे, हे पाहून तेथील जनताही खुश झाली होती. पण झाले काय? तर पंतप्रधानांनी दिलेले हे चेक चक्क बाउन्स झाले!
यासंदर्भात बोलताना अजमल पॉडकास्टमध्ये म्हणतो, “तत्कालीन पंतप्रधानांनी आम्हाला निमंत्रण देऊन 25-25 लाख रुपयांचा चेक दिला होता. आम्ही जाम खुश होतो. कारण 2009 मध्ये 25 लाख रुपये ही मोठी रक्कम होती. मात्र, चेकच बाउन्स झाला.
आम्ही म्हणालो सरकारी चेक बाउंस झाला. ते म्हणाले, आपल्याला पीसीबीचे चेअरमन चेक देतील. मात्र, त्यांनीही नकार दिला. चेअरमन म्हणाले, तुम्हाला चेक तिकडून मिळाला, मी कुठून देऊ.” यानंतर श्रीलंका दौऱ्यावर संघाला पराभवाचा सामना करावा लागला आणि बक्षिसाची रक्कम मिळालीच नाही. यसीसीकडून मिळालेली रक्कमच खेळाडूंना मिळाली. आम्ही काहीही करू शकलो नाही.