Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे

Asha Bhosle News: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि महान गायिका आशा भोसले यांनी २००७ मध्ये एक अनोखी 'म्युझिकल' जोडी जमवली होती, ज्याने 'यू आर द वन फॉर मी' सारखे सुपरहिट गाणे दिले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:04 IST

Open in App

नवी दिल्ली  - ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली आणि महान गायिका आशा भोसले यांनी २००७ मध्ये एक अनोखी 'म्युझिकल' जोडी जमवली होती, ज्याने 'यू आर द वन फॉर मी' सारखे सुपरहिट गाणे दिले होते. लीने आपल्या 'माय लाईफ : ब्रेट ली' या आत्मचरित्रात आशाजींचे वर्णन 'एक प्रेमळ, सात्त्विक महिला' असे केले होते, ज्यांची विनोदबुद्धी अत्यंत तल्लख होती. प्रख्यात गायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी रविवारी मुंबईत निधन झाले.

दोघांची पहिली भेट २००७ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान झाली. तेव्हा ली याला एका अशा अल्बममध्ये काम करण्याबद्दल विचारण्यात आले होते, ज्यात आंतरराष्ट्रीय कलाकार आणि बॉलीवूडमधील दिग्गज सहभागी होणार होते. या प्रस्तावात रस दाखवत त्याने होकार दिला, विशेषतः जेव्हा त्याला समजले की रॉबी विल्यम्ससारखी मोठी नावेही या प्रकल्पाचा भाग आहेत.

चार महिन्यांनंतर जेव्हा ते सिडनी ऑपेरा हाऊसमध्ये पुन्हा भेटले, तेव्हा आशाजींनी ली याला हा अल्बम भेट दिला, ज्यावर त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात वैयक्तिक संदेश लिहिला होता. ली म्हणतो, "हा अल्बम नेहमीच माझ्या सर्वात मौल्यवान ठेव्यांपैकी एक राहील."

"त्या एक अतिशय प्रेमळ आणि सौम्य महिला होत्या, ज्यांची विनोदबुद्धी जबरदस्त होती. या गाण्याचे चित्रीकरण मुख्यत्वे एका ऑफिसमध्ये झाले होते. मला नक्की काय करायचे आहे याची स्पष्ट कल्पना नसली तरी, मी त्या अनुभवाचा खूप आनंद घेतला." - ब्रेट ली

भारतीय संगीतातील 'अरेथा फ्रँकलिन'लीने २०११ मध्ये लिहिलेल्या आपल्या पुस्तकात म्हटले होते, मला सांगण्यात आले की या अल्बममध्ये माझ्यासाठी एक गाणे निवडले जाईल, मग मी ते शिकेन आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दरम्यान आशाजींसोबत त्याचे रेकॉर्डिंग करेन. हे खरोखर घडतंय यावर माझा विश्वासच बसत नव्हता; एका महान दिग्गज कलाकारासोबत काम करण्याची ही किती मोठी संधी होती. आशाजींना "भारतीय संगीतातील अरेथा फ्रँकलिन" असे संबोधत लीने रेकॉर्डिंगच्या अनुभवाबद्दल लिहिले की, क्रिकेटच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून त्याने आशाजींसोबतच्या चार तासांच्या रेकॉर्डिंगसाठी वेळ काढलाच होता.

टॅग्स :आशा भोसलेसंगीतआंतरराष्ट्रीय क्रिकेट