मुंबई - क्रिकेटमधला देव असा लौकिक असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बुधवारी आपला 46 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी सचिनवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. सचिनचा बालपणीचा मित्र असलेल्या विनोद कांबळीने तर त्याला खास गाणे गाऊन शुभेच्छा दिल्या. मात्र सचिनने विनोदने दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करतानाच त्याच्या नव्या लूकवरून त्याला ट्रोल केले.
त्याचे झाले असे की, बुधवारी सचिनला शुभेच्छा देण्यासाठी विनोद कांबळी याने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात त्याने 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या याराना चित्रपटातील तेरे जैसा यार कहॉ हे गाणे स्वत:च्या आवाजात गायले. दरम्यान, विनोद कांबळी याने दिलेल्या शुभेच्छांचा सचिनने एका दिवसानंतर स्वीकार केला. तसेच त्याला गमतीशीर भाषेत उत्तर देत विनोद कांबळीला ट्रोल केले.
''विनोद शुभेच्छांबद्दल धन्यवाद, तू गायलेले गाणे उत्तम आहे. पण तुझी दाढी पांढरी झाली तरी तुझ्या भुवया मात्र अजूनही कशाकाय काळ्या राहिल्या? असा सवाल करत सचिनने विनोद कांबळीची फिरकी घेतली.
सचिन तेंडुलकर आणि विनोज कांबळी हे भारतीय क्रिकेटमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एकत्रच केली होती. सुरुवातीला रमाकांत आचरेकर यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर ते शारदाश्रम शाळेकडून खेळले होते. पुढे मुंबई आणि भारतीय संघामध्येही ते एकत्र खेळले.