‘गब्बर’ नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनने २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचा सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. दरम्यान, २०१३ ते २०२२ या काळात एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा शिखर धवन हा विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर तिसरा खेळाडू आहे. शिखर धवनच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर आपल्याला असे वाटेल की, त्याने खूप लवकर निवृत्तीचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर शिखर धवनने त्याच्या निवृत्तीमागचे खरे कारण सांगितले आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिखर धवन म्हणाला की, २०२२ मध्ये इशान किशनने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावल्यानंतर मला जाणवले की आता माझे करिअर संपले आहे. संघातून वगळल्यानंतर त्याने कोणालाही फोन केला नाही. काही संघातील खेळाडू त्याच्याशी बोलण्याचा आणि त्याला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न केला. पण माझी कोणाविरूद्धही तक्रार नाही, असे त्याने म्हटले आहे.
धवनची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली होती. ऑक्टोबर २०१० ते फेब्रुवारी २०१३ या काळात त्याला अपयशाचा सामना करावा लागला. या काळात त्याने ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त ६९ धावा काढल्या. एकमेव टी-२० मध्ये त्याने फक्त ५ धावा काढल्या. परंतु, मार्च २०१३ हा शिखर धवनसाठी कारकिर्दीला आकार देणारा ठरला. धवनला मार्च २०१३ मध्ये कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यात धवनने अवघ्या ८५ चेंडूत शतक झळकावून जगाला आपली क्षमता दाखवून दिली. या विक्रमी खेळीनंतर धवनने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० संघाचा भाग बनला.
२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होता. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात, धवन भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो पुन्हा एकदा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर- सौरव गांगुलीनंतर रोहित शर्मा- शिखर धवन ही दुसरी सर्वात यशस्वी भारतीय जोडी आहे.