दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला, पण विजयानंतरचा सोहळा एका मोठ्या वादामुळे गाजला. भारतीय संघाने विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी विजेतेपदाची ट्रॉफी आणि पदके सोबत घेऊन गेले होते. यावर बीसीसीआयने एसीसीच्या बैठकीत निषेध नोंदविल्यानंतर नक्वी यांनी आता माफी मागितली आहे.
माध्यमांनुसार, एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष म्हणून नक्वी यांनी बीसीसीआयकडे या घटनेबाबत माफी मागितली असून, भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही याची खात्री दिली आहे. ट्रॉफी वाटपाच्या स्पष्टतेवर नक्वी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने बीसीसीआयचे प्रतिनिधी आशिष शेलार आणि राजीव शुक्ला हे दुबईत झालेल्या एसीसी बैठकीतून निषेधार्थ बाहेर पडले होते.
यावर नक्वी यांनी बीसीसीआयकडे माफी मागितली आहे. जे घडले, ते घडू नये होते. हे प्रकरण कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण करण्यासाठी नव्हते, असे नक्वी यांनी म्हटले आहे. तसेच भविष्यात संवाद व समन्वय वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. याचबरोबर ट्रॉफी थेट परत करण्यास नकार देत नक्वी यांनी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने एसीसी कार्यालयातून ती घ्यावी असे म्हटले आहे. या मागणीला बीसीसीआयने साफ नकार दिला असून, हे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.