Join us  

माझ्या आणि खेळाडूंना दिलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतका फरक का?; राहुल द्रविड BCCI वर नाराज

'वर्ल्डकप जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतकं अंतर कशासाठी ?'. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे ? अशी विचारणा राहुल द्रविडने बीसीसीआयला केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 10:26 AM

Open in App

मुंबई - भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाने चौथ्यांदा विश्वचषक जिंकत चौकार लगावला आहे. वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ सोमवारी मायदेशी परतला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना विश्वचषक जिंकण्याचा मोलाचा वाटा उचलणारा प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र नाराज दिसत होता. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल द्रविड बीसीसीआयच्या एका निर्णयावर नाराज दिसला. राहुल द्रविडने बीसीसीआयला विचारणा केली आहे की, 'वर्ल्डकप जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतकं अंतर कशासाठी ?'. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे ?. बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविडला 50 लाख, सपोर्ट स्टाफला 20-20 लाख आणि संघातील खेळाडूंना 30-30 लाखांचं बक्षिस जाहीर केलं होतं. 

इतर कोचिंग स्टाफच्या तुलनेत मोठी रक्कम देण्यावर राहुल द्रविडने आक्षेप नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविडने संपुर्ण कोचिंग स्टाफला एकसमान रक्कम दिली गेली पाहिजे असं आवाहन बीसीसीआयला केलं आहे. सोबतच स्टाफमध्ये मतभेद केला जाऊ नये असंही म्हटलं आहे. राहुल द्रविडने बोर्डाला स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, 'स्टाफने एका टीमप्रमाणे काम केलं आहे, ज्याचा परिणाम आपण वर्ल्डकप जिंकण्यात यशस्वी झालो. यामुळे प्रत्येकाला समान बक्षिस मिळालं पाहिजे'. 

भारताच्या युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत असताना, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मात्र ‘अंतिम सामन्यात आमची कामगिरी सर्वोत्तम नव्हती,’ असे मत व्यक्त करुन सर्वांचे लक्ष वेधले. प्रशिक्षक द्रविड यांनी म्हटले की, ‘माझ्या मते अंतिम सामन्यात आम्ही आमचा अव्वल खेळ सादर केला नाही. याहून अधिक चांगली खेळी आम्हाला करता आली असती. परंतु, एकूणंच या अंतिम सामन्यासारख्या हायव्होल्टेज लढतीचा अनुभव युवा खेळाडूंना मिळणे खूप महत्त्वाचे होते.’ 

द्रविडने पुढे म्हटले की, ‘या स्पर्धेसाठी गेल्या १४-१५ महिन्यांपासून सर्वांनी मेहनत घेतली असून ही एक प्रक्रीया होती. युवा खेळाडूंना यातून मिळालेला अनुभव त्यांना आयुष्यभर कामी येईल. भविष्यात मोठमोठ्या स्पर्धा खेळताना त्यांना या अनुभवाचा फायदाच होणार आहे. मुंबई विमानतळावर झालेले स्वागत त्यांच्यासाठी एक अनोखा अनुभव होता आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचाही अनुभव मिळाला. यामुळे कारकिर्दीच्या सुरुवातीला असे विविध अनुभव युवांना मिळत आहे याचे समाधान मिळते. पण यापुढे त्यांच्यासमोर खरे आव्हान असून त्यासाठी त्यांना कठोर मेहनत घ्यायची आहे.’

संघबाधणीच्या प्रक्रीयेबाबत अधिक सांगताना द्रविड म्हणाला की, ‘संघ बांधणीचा प्रवास केवळ विश्वचषक स्पर्धेपुरता मर्यादित नव्हता, तर खेळाडूंची प्रगतीही अत्यंत महत्त्वाची होती. प्रत्येक खेळाडूने या प्रक्रीयेमध्ये स्वत:मध्ये सुधारणा करण्यासाठी मेहनत घेतली. प्रत्येकानेच गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टींचा त्याग केला होता. सर्व खेळाडूंनी ज्याप्रकारे सांघिक खेळ केला, ते अप्रतिम होते. दबावाच्या परिस्थितीमध्येही त्यांनी चांगला खेळ केला. हा एक महत्त्वाचा अनुभव सर्व युवा खेळाडूंना आता मिळाला आहे. शिवाय सपोर्ट स्टाफने जे योगदान दिले त्याचा खेळाडूंना मोठा फायदा झाला.’

त्याचप्रमाणे, ‘आताची पिढी खूप टेक्नोसॅव्ही असून त्यांची तुलना आमच्या पिढीसोबत होऊ शकत नाही. जेव्हा मी १९ वर्षांखालील क्रिकेट खेळलो, तेव्हा विश्वचषक नव्हते. त्यावेळी आम्ही भारतात न्यूझीलंडविरुद्ध एक मालिका खेळलो होतो. त्यावेळी फारसे क्रिकेट नव्हते. त्यावेळच्या तुलनेत आजचे क्रिकेट खूप बदलले आहे आत्ताचे खेळाडू खूप तंदुरुस्त असून ते अत्यंत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळत आहेत. या सर्व गोष्टींचा मोठा फायदा भारतीय क्रिकेटला होईल,’ असेही द्रविडने यावेळी म्हटले.

टॅग्स :राहूल द्रविडपृथ्वी शॉ19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा