चेन्नई : डावखुरा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायर आणि सलामीवीर शाय होप्स यांनी झळकावलेल्या शतकांमुळे पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान भारताला ८ गडी आणि १३ चेंडू राखून पराभूत करीत वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी प्रारंभ केला.चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ८ बाद २८७ धावा केल्या. यात ऋषभ पंत (७१), श्रेयस अय्यर (७०) यांच्या अर्धशतकांसह केदार जाधव (४०) आणि रोहित शर्मा (३६) यांनी उल्लेखनीय योगदान दिले.
संथ खेळपट्टीवर कर्णधार विराट कोहलीसह (४) भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. प्रत्युत्तरात, ४७.५ षटकांमध्ये २ बाद २९१ धावा फटकावत विंडीजने सामना जिंकला. १०६ चेंडूंत ७ षटकार आणि ११ चौकारांसह १३९ धावांचा शतकी तडाखा देणारा हेटमायर विजयाचा शिल्पकार ठरला. सलामीवीर शाय होप्सने नाबाद १०२ धावा (१५१ चेंडूंत १ षटकार, ७ चौकार) करीत त्याला मोलाची साथ दिली. निकोलस पूरन २९ धावांवर नाबाद राहिला.
सलामीवीर अम्ब्रिस (९) झटपट बाद झाल्यावर होप्स-हेटमायर जोडीने दुसऱ्या गड्यासाठी २१८ धावांची भागिदारी करीत विंडीजचा विजय निश्चित केला. या विजयासह ३ सामन्यांच्या मालिकेत विंडीजने १-० अशी आघाडी घेतली आहे. एकदिवसीय प्रकारामध्ये या वर्षात विंडीजने भारतावर मिळविलेला हा पहिलाच विजय ठरला.तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यावर प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा-के. एल. राहुल यांनी सावध प्रारंभ केला. मात्र, सातव्या षटकात राहुल (६)आणि कर्णधार विराट कोहली (४)यांना बाद करून कॉटरेलनेविंडीजला मोठे यश मिळवून दिले.संथ खेळपट्टीवर रोहितलाही त्याच्या नैसर्गिक शैलीनुसार फटकेबाजी करता आली नाही. ५६ चेंडूंतील ३६ धावांची त्याची खेळी अल्झारी जोसेफने संपविली.श्रेयस-ऋषभ जोडीने भारताच्या डावाला स्थिरता दिला. हे दोघे १६ धावांच्या अंतराने बाद झाल्यानंतर पुण्याच्या केदार जाधवने झटपट ४० धावांचे (३५ चेंडूंत १ षटकार, ३ चौकार) योगदान दिले. अखेरच्या षटकांत केदार जाधव आणि रवींद्र जडेजा (२१ चेंडूंत २१ धावा, २ चौकार) यांनी सहाव्या गड्यासाठी केलेल्या ५९ धावांच्या भागिदारीमुळे भारताला पावणेतीनशे पार मजल मारता आली.चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांला पहिल्या१९ षटकांत केवळ ८० धावाकरता आल्या. यानंतर मात्र श्रेयस-ऋषभ जोडीने खेळपट्टीवर जम बसवला. त्यांनी प्रारंभी संयमानेखेळ केला.चेंडूवर नजर बसल्यानंतर त्यांनी मोठे फटकेही लगावले. भारताच्या डावातील पहिला षटकाररोस्टॉन चेसने टाकलेल्या २८व्या षटकात ऋषभने मारला. विंडीजतर्फे शेल्डॉन कॉटरेल, किमो पॉलआणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
जडेजाला बाद देण्यावरूनकर्णधार कोहली नाराजडावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा याला बाद देण्यात आले तेव्हा कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंग रूममधून पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवली. ४८व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. जडेजाने किमा पॉलच्या चेंडूवर वेगात एकेरी धाव घेतली.त्याच वेळी रोस्टॉन चेसने चेपळाईने थ्रो करीत नॉन स्ट्रायकिंग एंडचे स्टंप उडविले. जडेजा क्रीझमध्ये पोहचला असे समजून विंडीजच्या खेळाडूंनी धावबादचे अपिल करण्याचे टाळले. मात्र, चेसच्या थ्रोने स्टंप उडाले तेव्हा जडेजा क्रीझच्या बाहेर होता. मात्र, विंडीजच्या खेळाडूंनी अपिल न केल्याने पंच शॉन जॉर्ज यांनी जडेजाला बाद ठरविले नाही.दरम्यान, मैदानावर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर रिप्ले बघितल्यावर विंडीजचा कर्णधार पोलॉर्ड पंचांकडे गेला आणि मैदानावरील पंचांनी तिसºया पंचांना निर्णय मागितला. तिसरे पंचा रॉड टकर यांनी जडेजाला धावबाद दिल्यामुळे कोहली नाराज झाला. कारण नियमानुसार, विंडीजच्या खेळाडूंनी जडेजा धावबाद असल्याचे अपिल केले नव्हते.
नियमानुसार, प्रतिस्पर्ध्यांनी अपिल केले नसल्यास खेळाडू बाद आहे किंवा नाही, या संदर्भात मैदानावरील पंच तिसºया पंचांना निर्णय मागू शकत नाही. मात्र, या नियमाचे पालन न करता जडेजाला बाद देण्यात आले. कोहलीने चौथे पंच अनिल चौधरी यांच्याशी चर्चा केली. मात्र, त्याने यासंदर्भात मैदानावर जाऊन पंचांशी चर्चा करणे टाळले.