अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स याला आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. भारतीय सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल याच्या दिशेने चेंडू फेकल्याबद्दल सील्सला त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स याने फलंदाज जयस्वाल क्रीझवर असताना, आक्रमक पद्धतीने त्याच्या दिशेने चेंडू फेकला. खेळाडूच्या दिशेने अनावश्यक आक्रमकता दाखवणे हे आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन मानले जाते. सामनाधिकारी आणि पंचांनी नोंदवलेल्या तक्रारीनंतर सील्सवर ही कारवाई करण्यात आली.
यापूर्वी, डिसेंबर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना त्याला पहिला डिमेरिट पॉइंट मिळाला होता. आयसीसीच्या नियमांनुसार, २४ महिन्यांच्या कालावधीत चार डिमेरिट पॉइंट्स जमा झाल्यास खेळाडूला निलंबनाचा सामना करावा लागतो. सील्सच्या खात्यात आता दोन डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत, त्यामुळे पुढील दोन वर्षांत त्याने आणखी दोन वेळा नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.