West Indies Cricket Match Fixing: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पाऊल उचलत वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्काळ निलंबित केले आहे. 'बार्बाडोस इंटरनॅशनल मास्टर्स' (BIM) या टी-१० लीगमध्ये मॅच फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराचे नियम मोडल्याचा ठपका या खेळाडूवर ठेवण्यात आला आहे.
खेळाडू आणि अधिकाऱ्यांवर बंदी
आयसीसीने केवळ खेळाडूलाच नाही, तर या प्रकरणाशी संबंधित असलेल्या दोन टीम ऑफिशियल्सनाही निलंबित केले आहे. या सर्वांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून चौकशी पूर्ण होईपर्यंत ते क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यात किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत. आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटने (ACU) दिलेल्या माहितीनुसार, या खेळाडूने आणि अधिकाऱ्यांनी सामन्याचे निकाल बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच बुकींच्या संपर्कात राहून माहिती पुरवली.
BIM स्पर्धेत घडला प्रकार
बार्बाडोसमध्ये खेळल्या गेलेल्या टी-१० मास्टर्स लीग दरम्यान संशयास्पद हालचाली दिसून आल्या. या स्पर्धेत निवृत्त झालेले आणि काही सक्रिय वरिष्ठ खेळाडू सहभागी झाले होते. याच स्पर्धेतील एका सामन्यात फिक्सिंग झाल्याचे पुरावे आयसीसीला मिळाले आहेत. आयसीसीने स्पष्ट केले आहे की, क्रिकेटच्या खेळात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. खेळाची प्रतिमा डागाळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल.
कोण आहे तो खेळाडू?
जेवॉन सियरल्स असे त्या खेळाडूचे नाव असल्याची चर्चा आहे. पण वेस्ट इंडिजच्या खेळाडूचे नाव अद्याप अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आलेले नाही, मात्र तो एक अनुभवी खेळाडू असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे कॅरिबियन क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अशा खाजगी लीगमध्ये होणाऱ्या फिक्सिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित खेळाडूला आपले म्हणणे मांडण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला आहे, मात्र प्राथमिक पुराव्यांच्या आधारे हे निलंबन लागू करण्यात आले आहे.