West Indies announce T20 World Cup squad : क्रिकेट वेस्ट इंडिजने ( CWI) आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गुरुवारी त्यांचा संघ जाहीर केला. १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी CWI ने १५ खेळाडूंची निवड केली. त्यात आंद्रे रसेल व सुनील नरीन या दोन अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात न आल्याने चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वेस्ट इंडिज संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी काही दिवसांपूर्वी रसेलवर फ्रँचायझी लीगला प्राधान्य देण्यावरून टीका केली होती. त्यावर रसेलनेही वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु CWI ने त्याला ही संधी दिली नाही.
वेस्ट इंडिज हा एकमेव संघ आहे की ज्यांनी दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने २०१२ मध्ये श्रीलंकेत व २०१६मध्ये भारतात झालेला वर्ल्ड कप जिंकला होता. २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संघाबाहेर असलेल्या एव्हिन लुईसचे पुनरागमन झाले आहे. तर फिरकीपटू यानिक चरिहा व अष्टपैलू रेयमन रैफर या अनकॅप्ड् खेळाडूंना संधी दिली गेली आहे. २०१६ पासून संघाबाहेर असलेल्या जॉन्सन चार्ल्सच्या निवडीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आंद्रे रसेल व फॅबियन अॅलन यांना संघात स्थान मिळालेलं नाही.
१७ ऑक्टोबरला वेस्ट इंडिजचा संघ स्कॉटलंडविरुद्ध, १९ तारखेला झिम्बाब्वे आणि २१ तारखेला आयर्लंडशी भिडणार आहे. ब गटातून अव्वल दोन संघ सुपर १२ मध्ये एन्ट्री घेतील. वेस्ट इंडिजचा हा संघ ५ व ७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.