Join us

WIvsSA : वेस्ट इंडिजचे पराभवाचे द्विशतक, दक्षिण आफ्रिकेचा डावानं दणदणीत विजय

वेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव व 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 14:15 IST

Open in App

वेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव व 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला. लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा व अॅनरिच नॉर्ट्जे यांच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजला दोन्ही डावांत तग धरता आला नाही. त्यांचा पहिला डाव 97 आणि दुसरा डाव 162 धावांत गडगडला. दक्षिण आफ्रिकेनं क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर 322 धावा केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये 200 पराभव पत्करावा लागलेला विंडीज हा इंग्लंड ( 308) व ऑस्ट्रेलिया ( 226) नंतरचा तिसरा संघ ठरला आहे. पण, इंग्लंडनं 377 आणि ऑस्ट्रेलियानं 394 सामने जिंकले आहेत, याउलट विंडीजच्या खात्यात 177 विजय आहेत. 

लुंगी एनगिडीनं पहिल्या डावात 19 धावांत 5 विकेट्स घेतल्या, तर नॉर्ट्जेनं 35 धावांत 4 व रबाडानं 1 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली. विंडीजचा पहिला डाव 97 धावांत गडगडला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेनं क्विंटन डी कॉकच्या नाबाद 141 धावांच्या जोरावर त्रिशतकी पल्ला गाठला. डी कॉकनं 170 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकारांसह ही खेळी साकारली. एडन मार्करामनं 110 चेंडूंत 7 चौकारांसह 60 धावा केल्या. विंडीजकडून जेसन होल्डर ( 4-75), जेडन सील्स ( 3-75) व केमार रोच ( 2-64) यांनी चांगली गोलंदाजी केली. विंडीजकडून दुसऱ्या डावात संघर्ष पाहायला मिळाला, परंतु तो फक्त रोस्टन चेसकडून... त्यानं 156 चेंडूंत 62 धावा केल्या. अन्य सहकाऱ्यांनी रबाडासमोर गुडघे टेकले आणि त्यांचा दुसरा डावही 162 धावांवर गडगडला. रबाडानं 34 धावांत 5 विकेट्स घेतल्या. नॉर्ट्जे व केशव महाराज यांनी अनुक्रमे तीन व दोन विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :वेस्ट इंडिजक्विन्टन डि कॉकद. आफ्रिका