इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये अम्पायरच्या निर्णयांची चर्चा रंगतेय... विराट कोहलीच्या बॅटला चेंडू लागूनही त्याला LBW दिल्याचा निर्णय, दिल्ली कॅपटिल्सविरुद्धचा No Ball न दिल्याने झालेला वाद यामुळे भारतीय अम्पायर्सच्या कौशल्यावर प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. पण, सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत अम्पायरच्या निर्णयाची चर्चा रंगली आहे. कौंटी अजिंक्यपद स्पर्धेतील डिव्हिजन १मधील केंट आणि हॅम्पशायर यांच्यातील सामन्यात हा अचंबित करणारा निर्णय अम्पायरने दिला. केंटचा फलंदाज जॉर्डन कॉक्स याला या अम्पायरच्या अचंबित निर्णयाचा फटका बसला. 
केंटच्या दुसऱ्या डावातील ८०व्या षटकात हे सर्व घडले. जॉर्डन ६४ धावांवर खेळत होता आणि फिरकीपटू फेलिस्क ऑर्गन याने टाकलेल्या चेंडूवर कॅचची अपील झाली. चेंडू ऑफ स्टम्प्सच्या बाहेर होता आणि जॉर्डनच्या पायावर आदळून तो हवेत उडाला. शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या जोन विथर्लीने तो टिपला आणि कॅचची अपील झाली. त्यावर अम्पायरने आऊट देताच फलंदाज आश्चर्यचकीत झाला.  
सोशल मीडियावर ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स,ग्रॅमी स्वाम, लिएम लिव्हिंगस्टोन व सॅम बिलिंग्स यांनी आश्चर्य व्यक्त केले.